दरोडेखोरांना सात वर्षांची शिक्षा
By admin | Published: July 8, 2017 05:25 AM2017-07-08T05:25:35+5:302017-07-08T05:25:35+5:30
कसारा घाटात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कसारा घाटात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एस. पी. गोगरकर यांनी शुक्रवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
आबिद हमीद खान, जावेद वाहिद खान, आसिफ रफिक शेख, मोहम्मद सलमान मोहम्मद सलिम आणि नीलेश जोशी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१२ मध्ये मुंबईत राहणारे राहुल जाधव हे द्वारका नाक्यावर गाडीच्या प्रतीक्षेत थांबले होते. आरोपींनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा केला. गाडीत बसवून त्यांना कसारा घाटात नेले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. त्यानंतर त्यांना वाटेत सोडून दिले.
याप्रकरणी जाधव यांनी दरोडेखोरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात अॅडहोक कोर्टाने पाचही जणांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश गोगरकर यांच्याकडे अपील केले होते. ते गोगरकर यांनी फेटाळून लावताना अॅडहोक कोर्टाने दिलेल्या शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात सरकारी वकील अॅड. अश्विनी भामरे-पाटील यांनी कामकाज पाहिले.
सराईत गुन्हेगार
शिक्षा सुनावलेले पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वीही त्यांनी गुजरात महामार्गावर एका वृद्ध दांम्पत्याला लुबाडले होते. ही बाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच काही साक्षीदार न्यायालयाने तपासले होते.