अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल : वागळे इस्टेट भागातील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2023 08:27 PM2023-09-18T20:27:42+5:302023-09-18T20:28:01+5:30
रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी बाहेर गेली असता, तिला फूस लावून एका बंगल्याच्या बाजूला नेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका १२ वर्षीय मुलीला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला वागळे इस्टेट भागातील झुडपामध्ये नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या रोहित मोरे (वय २५, रा. किसननगर, ठाणे) या आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने ठोठावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा न्यायालयाने सुनावल्याची माहिती सरकारी वकील विवेक कडू यांनी सोमवारी दिली.
रोहित याने वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या या पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला पैशाचे आमिष दाखवत १९ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी बाहेर गेली असता, तिला फूस लावून एका बंगल्याच्या बाजूला नेले. त्याच भागातील झुडपामध्ये तिचा विनयभंग करीत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. २० नोव्हेंबर २०१७ रोजी अपहरणासह बलात्कार आणि विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याखाली वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिस उपनिरीक्षक एस. डी. गवते आणि आर. एम. गोळे आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली होती.
याच गुन्ह्यातील सर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरून आरोपीला ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा १६ सप्टेंबर २०२३ रोजी सुनावली. सरकारी अभियोक्ता म्हणून विवेक कडू यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार अमोद सडेकर यांनी काम पाहिले.