रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्याचे सात झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:55+5:302021-05-05T05:06:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : औषधींचा काळाबाजार थांबवून रेमडेसिविर, टॉसिलिझुमॅब इंजेक्शनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी आता जिल्ह्यात सात झोन तयार केले ...

Seven zones of Thane district for supply of Remedesivir | रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्याचे सात झोन

रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्याचे सात झोन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : औषधींचा काळाबाजार थांबवून रेमडेसिविर, टॉसिलिझुमॅब इंजेक्शनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी आता जिल्ह्यात सात झोन तयार केले आहेत. त्यामार्फत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने आता थेट रुग्णालयांना पुरवठा सुरू आहे. गेल्या वीस दिवसांत तब्बल ४४ हजार ९५२ रेमडेसिविर व १३० टॉसिलिझुमॅबचा पुरवठा रुग्णालयांना करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि त्यावरील उपचारासाठी डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्याशिवाय पुण्यासह रायगडमध्ये या इंजेक्शनची रिॲक्शन झाल्यामुळे दरम्यान हा औषधी साठा मार्केटमधून कंपनीने परत मागवून घेतला. त्यामुळे मध्येच उद‌्भवलेल्या या इंजेक्शनच्या तुटवड्याचा गैरफायदा घेऊन काळाबाजार सुरू झाला. मात्र, आता मागणीस अनुसरून जिल्ह्यात रेमडेसिविरचा ५० टक्के पुरवठा रुग्णालयांना सुरू आहे. त्यातच कंपनीने या इंजेक्शनचा केलेला पुरवठा मार्केटमधून परत घेतल्यामुळे तो मंदावला होता. मात्र, आता तो सुरळीत होत आहे, असे अंबरनाथ, उल्हासनगर झोनचे अन्न व औषधपुरवठा सहआयुक्त पी.बी. मुंदडा यांनी लोकमतला सांगितले.

रेमडेसिविर मार्केटमध्ये न पाठवता आता रुग्णालयांच्या मागणीनुसार पाठवले जात आहे. टॉसिलिझुमॅबचे ८०० इंजेक्शन राज्याला मिळाले होते. त्यातून ठाणे जिल्ह्याला सोमवारी ७० व पालघरला २५ इंजेक्शनचे वाटप झाले आहे. रेमडेसिविरच्या मागणीचे प्रिस्क्रिपशन आता मार्केटला पाठवण्याची बंदीच डॉक्टरांना ठाणे महापालिका आयुक्त व नवी मुंबई महापालिकेने घातली आहे. यातही आता रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमीच झाल्याने हा तुटवडा भासणारच नाही, असेही मुंदडा यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयांनी मागणी केल्याच्या प्रमाणात ५० टक्केच्या जवळपास रेमडेसिविरचा पुरवठा सुरू असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनानेही निदर्शनात आणून दिले. आतापर्यंत रुग्णालयांनी ९२ हजार २३६ रेमडेसिविरची मागणी नोंदवलेली आहे. त्यानुसार ४४ हजार ९५२ रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयांना पुरवण्यात आले आहे. या इंजेक्शनची रोज पाच ते सहा हजारची मागणी आहे. त्यानुसार कंपनीकडून ५० टक्के किंवा त्यानुसार थोडा कमी पुरवठा होतो. सोमवारी पाच हजार ८३०ची मागणी होती. त्यापैकी दोन हजार ५२१ रेमडेसिविरचा पुरवठा झाला, असे या रेमडेसिविर नियंत्रण कक्षाचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी सांगितले. काल टॉसिलिझुमॅब २९५ इंजेक्शनची मागणी होती. त्यापैकी ७० इंजेक्शन रुग्णालयांना पुरवल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले.

Web Title: Seven zones of Thane district for supply of Remedesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.