उल्हासनगर महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:41 AM2021-01-13T02:41:03+5:302021-01-13T02:41:22+5:30
कामबंद आंदोलन मागे : महापौरांच्या मध्यस्थीला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटनेने मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले. महापौर लीलाबाई अशान यांनी निर्णायक भूमिका वठविल्याने, जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याला आयुक्तांनी मान्यता दिली. सातव्या वेतन आयोगाला मान्यता मिळताच कामगार संघटनेने कामबंद आंदोलन मागे घेतले.
उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करीत होती. संघटनेच्या मागणीला आयुक्त डॉ. राजा दयानिधी दाद देत नसल्याच्या निषेधार्थ कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू ठेवले. सोमवारी कामगार कृती समितीने आयुक्त डॉ. दयानिधी यांची भेट घेऊन, सातवा वेतन आयोग लागू करीत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली. मंगळवारी सकाळी १० वाजता शेकडो कामगारांनी कामबंद ठेवून महापालिका प्रवेशद्वारजवळ ते एकत्र आले. कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात, दीपक दाबने आदींनी कामगारांना मार्गदर्शन केले.
महापौर अशान यांनी कामगार नेते, आयुक्त दयानिधी, उपायुक्त मदन सोंडे, मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलाविले. जानेवारीपासून कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. जानेवारी महिन्याची ११ तारीख उलटूनही पगार झाला नसल्याबाबत कामगार नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर अशान यांच्या आदेशावरून आजच्या आज कामगारांचे वेतन देण्यात आल्याची माहिती उपायुक्त सोंडे यांनी दिली.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका कामगारांना बसला आहे. कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यास १२ दिवस उशीर झाल्याने, घरासह इतर कर्जाचे हप्ते भरले न गेल्याने कामगारांना भुर्दंड पडला आहे.
- दिलीप थोरात, कामगार नेते, पालिका कामगार, कर्मचारी संघटना