मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला भीषण आग
By धीरज परब | Published: February 24, 2024 08:29 PM2024-02-24T20:29:15+5:302024-02-24T20:30:03+5:30
सतत लागणाऱ्या आगीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन धावगी डम्पिंग मध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी भीषण आग लागली. आगी मुळे सर्वत्र घातक धुराचे लोट पसरले असून सतत लागणाऱ्या आगी मुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
उत्तनच्या धावगी येथे शासनाकडून घनकचरा प्रकल्पासाठी मीरा भाईंदर महापालिकेला मोफत जागा देण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी महापालिकेच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणे झालेली आहेत . त्यातच महापालिकेने प्रक्रिया न करताच कचरा गोळा केल्याने येथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली . आग भीषण असल्याने धुराचे लोट उसळले. महापालिकेच्या अग्निशन दलाचे अधिकारी ४ अधिकारी व २७ जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत . परंतु रात्री उशिरा पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती .
९ अग्निशमन बंब व ८ पाण्याचे टँकर आग विझवण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले . उत्तन डंपिंग येथे साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरास आगी लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत . त्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. जेणेकरून नागरिकांना श्वास घेणे सुद्धा अवघड होत असते. त्यामुळे परिसरातील लोकं संतप्त झाले आहेत.