नांदिवलीत १४ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:29+5:302021-03-17T04:41:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली भागातील काही इमारतींमध्ये पाणीटंचाई भेडसावत असून, नागरिक हैराण झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली भागातील काही इमारतींमध्ये पाणीटंचाई भेडसावत असून, नागरिक हैराण झाले आहेत. टँकरवर किती दिवस पैसे खर्च करायचे, असा सवाल त्यांनी केला आहे. जोपर्यंत पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी बिल मागू नये, असा पवित्रा रहिवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, नांदिवली टेकडी परिसरातील शांताराम दर्शन, श्री संकल्प, अंबर तीर्थ सोसायटी, यशश्री अपार्टमेंट, महाकाली आर्केड आदी ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. यापैकी काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी रहिवाशांना पैसे खर्च करावे लागत आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे या रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे. गेल्या १४ दिवसांपासून नांदिवली टेकडी परिसरात पाणी नाही. तेथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; परंतु केडीएमसीला आम्ही पाणीपट्टी भरतो, असे एका महिलेने सांगितले. गेल्या चौदा दिवसांपासून दररोज २०० रुपये भरून टँकर येत असून, हे किती दिवस चालणार, असा सवाल तिने केला. ज्या सोसायटीचे पाण्याचे बिल बाकी आहे अशा सोसायट्यांची पाइपलाइन येत्या २० मार्चपासून तोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हे खरे आहे का, असा सवाल महिलेने केला. जर पाणी येत नसेल तर बिल कसले भरायचे, असेही ती म्हणाली.
............
* सांगाव, सांगर्ली, भोपर, दावडी, तसेच नांदिवलीत काही ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे त्याबाबत सातत्याने आम्ही महापालिका, एमआयडीसीकडे पाठपुरावा करीत आहोत. बहुतांश ठिकाणी जलवाहिन्या जुन्या झाल्याने नवीन टाकण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा दाब वाढविल्यास जुन्या जलवाहिन्या फुटण्याची शक्यता असल्याचे कारण सांगण्यात येते. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे असा प्रयत्न सुरू आहे.
- प्रकाश म्हात्रे, नेते, शिवसेना
--------