शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक प्रकल्प : बाधित खारफुटीच्या बदल्यात वनीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:03 AM2018-08-16T05:03:05+5:302018-08-16T05:03:21+5:30
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे.
- नारायण जाधव
ठाणे : मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे. या बदल्यात एमएमआरडीएने वनविभागाला रायगड जिल्ह्यातील पनवेल, श्रीवर्धन तालुक्यांतील तितक्याच क्षेत्राच्या वनेतर जमिनीसह पर्यायी वनांची लागवड, कांदळवन लागवडीसह समुद्री जिवांच्या संवर्धनाकरिता मोठा निधी कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केला आहे. शिवाय, पर्यायी २०० हेक्टर कांदळवन लागवडीची हमी घेतली आहे. याच अटीवर सी-लिंकच्या मार्गात बाधित होणारे संरक्षित वन आणि खारफुटी तोडण्यास ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने एमएमआरडीएला परवानगी दिली आहे.
मुंबई व नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक सेतूकडे पाहिले जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाल्यानंतर हा २२.५ किमीचा सेतू होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे दक्षिण मुंबई व नवी मुंबई विमानतळ हे अंंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेतूचे काम रखडले होते. मात्र, आता सर्व परवानग्या मिळाल्या असून त्यात बाधित होणाºया ४७.४१७ हेक्टर संरक्षित वनजमीन आणि खारफुटीच्या बदल्यात एमएमआरडीएने वनविभागाला तितक्याच वनेतर जमिनीसह नव्याने २०० हेक्टर कांदळवन लागवडीची हमी घेतली आहे. जी वनेतर जमीन उपलब्ध करून दिली आहे, त्यावर वनलागवडीचा खर्चही वनविभागाला दिला आहे. जे ४७.४१७ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र जाणार आहे.
वनीकरणाकरिता खर्चही दिला
पर्यायी वनाकरिता एमएमआरडीएने मोठा निधीही संबंधित यंत्रणांकडे सुपुर्द केला आहे. यात वनीकरणाकरिता २ कोटी १४ लाख ३ हजार ३२३, नक्तमूल्य म्हणून ४ कोटी ४५ लाख २४ हजार ५६३, पक्षी अधिवासाकरिता कृत्रिम घरटी बांधणे आणि मृदजलसंधारणाच्या कामाकरिता ६२ लाख ५० हजार, तसेच पर्यायी २०० हेक्टर कांदळवन लागवडीकरिता ५ कोटी ५ लाख ८८ हजार ६०० रुपये निधी कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केला आहे.
याशिवाय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सुचवलेल्या शिफारशी आणि राज्य वन्य जीव मंडळाने केलेल्या सुधारणा एमएमआरडीएने स्वखर्चाने करणे आवश्यक आहे. त्यानुसार, मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष, यांनी समुद्री जिवांच्या संवर्धनासाठी प्रस्तावित केलेले ८६ कोटी ३१ लाख रुपयेसुद्धा प्रकल्प यंत्रणा अर्थात एमएमआरडीएने कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केले आहेत.
या अटींवर दिली आहे परवानगी
खारफुटी तोडण्याची व सी-लिंकची कामे परवानगी वनक्षेत्रात कामे करण्यापुरती आहे. प्रकल्प यंत्रणेने कामे सुरू करण्यापूर्वी वनसंरक्षकांना कळविणे आवश्यक आहे. तसेच झाडे तोडण्यासाठी वनक्षेत्रपालांची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. जे कांदळवन वृक्ष काढावे लागणार आहेत, त्यांना कमीतकमी हानी पोहोचवावी.