डोंबिवलीतील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 07:00 PM2019-01-11T19:00:35+5:302019-01-11T19:06:39+5:30

डोंबिवलीच्या मानपाडा भागातील गंगेश्वर रेसिडेन्सीमधील भाडयाने घेतलेल्या एका सदनिकेमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या मेशरम बेगम सिमरन अली आणि रोजीना बिवी उर्फ रिया सरदार या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून पाच पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.

Sex racket exposed in Dombivli elite by Thane Ahtc Squad | डोंबिवलीतील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पाच तरुणींची सुटका

Next
ठळक मुद्देपाच तरुणींची सुटका मानपाड्यातील गंगेश्वर रेसिडेन्सीतील प्रकार पाचपैकी चौघी बांग्लादेशीय

ठाणे : डोंबिवलीच्या मानपाडा भागातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये चालणा-या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रॅकेट चालविणा-या मेशरम बेगम सिमरन भिशा अली (३४) आणि रोजीना बिवी उर्फ रिया अबूल कलाम सरदार (२८) या दोघींना अटक केली असून त्यांच्या तावडीतून पाच पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फोन कॉलच्या आधारे मोबाइलवरून दोन दलाल महिला काही तरुणींकडून मानपाडा येथील एका घरामध्ये शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्या आधारे १० जानेवारी रोजी दुपारी ४ वा. च्या सुमारास या पथकाने संबंधित फोनवरून खात्री केली. तेंव्हा त्यांच्या बनावट गि-हाईकाला मानपाडा पेट्रोलपंपासमोरील बस थांब्याजवळ यातील दलाल महिलेने बोलविले. तिथून गंगेश्वर रेसिडेन्सी मधील एका टू बीएचकेच्या खोलीत त्यांनी त्याला नेले. जातांना या गि-हाईकाने त्याची एक ओळख बाहेर ठेवल्याने दौंडकर यांच्या पथकाने काही वेळाने त्याठिकाणी धाड टाकली. याच धाडीत या पाच तरुणींची सुटका त्यांनी केली. त्यातील चौघी बांग्लादेशी तर एक कोलकता येथील आहे. या प्रत्येकींसाठी गि-हाईकांकडून तीन हजार रुपये काढले जात होते. त्यातील एक हजार मेशरम तर एक हजार रोजीना आणि उर्वरित एक हजार रुपये संबंधित मुलीला दिले जायचे. यातील सिमरन गि-हाईक शोधायची तर रोजीना गरजू मुलींना नोकरीच्या अमिषाने या जाळ्यात ओढायची. या दोघीही डोंबिवलीतील रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
.....................

Web Title: Sex racket exposed in Dombivli elite by Thane Ahtc Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.