शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार: संतापाची लाट उसळल्यानंतर CM-DCM 'ॲक्शन मोड'वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 01:05 PM2024-08-20T13:05:29+5:302024-08-20T13:07:22+5:30

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केलं.

Sexual abuse of 2 minors in school CM DCM on action mode after public outrage | शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार: संतापाची लाट उसळल्यानंतर CM-DCM 'ॲक्शन मोड'वर!

शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार: संतापाची लाट उसळल्यानंतर CM-DCM 'ॲक्शन मोड'वर!

Badlapur School ( Marathi News ) :बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलींच्या पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केलं. नागरिकांच्या उद्रेकानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सूचना करत याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपीला कडक शासन करण्यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.     

या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितलं. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता सदर प्रकार निदर्शनास आणून देता आला पाहिजे अशी यंत्रणा हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई होईल, असं आश्वासन दिलं आहे. "बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत दोन तासांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत," अशी माहिती फडणनवीस यांनी दिली आहे. 
 
नेमकं काय घडलं?

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १२ ते १३ ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी नंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षे मुलीवर सुद्धा अत्याचार झाला होता. याचा अजून पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यातच आता हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल १२ तास रखडवून ठेवण्यात आले आणि १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. 

Web Title: Sexual abuse of 2 minors in school CM DCM on action mode after public outrage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.