बसचालकाकडून चिमुरड्याचा लैंगिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 05:09 AM2018-02-09T05:09:46+5:302018-02-09T05:10:24+5:30
बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत दुसरीमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ शाळेच्या बसचालकाने केला आहे.
बदलापूर : बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत दुसरीमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ शाळेच्या बसचालकाने केला आहे. हा प्रकार विद्यार्थ्याने पालकांना सांगितल्यावर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकालाही या बसचालकाने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर बसचालकाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूरमध्ये राहणारे मंगेश पाटील यांचा मुलगा गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. शाळेचा बसचालक रवी लवाटे हा बसमधून प्रवास करणाºया पाटील यांच्या मुलासोबत अश्लील चाळे करत होता. हा प्रकार त्या मुलाने आपल्या पालकांना सांगितला. तसेच या भीतीने तो शाळेत जाण्यासाठी घाबरत होता. पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारला असता बसचालकाने त्यांच्यावरच हल्ला केला. रवीसोबत त्याच्या इतर बसचालक सहकाºयांनीही पाटील यांना बेदम मारहाण करत दहशत निर्माण केली. या प्रकारानंतर जखमी पाटील यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर रवीविरोधात लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात माहिती घेतली असता हा प्रकार सहा ते नऊ महिन्यांपूर्वीचा असून या प्रकरणाची तक्रार आल्यावर संबंधित पालकाने विद्यार्थ्याची बसदेखील बदलली होती. बस बदलल्यावरही रवी हा विद्यार्थ्याला रागाने पाहत
होता. त्यामुळेच पाटील यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, बसचालकाने या पालकालाच मारहाण केली. या प्रकरणात पाटील यांनी केवळ बसचालकाकडे तक्रार केली होती. मात्र, शाळेकडे कोणतीच तक्रार केली नव्हती, हे समोर आले आहे.
>रवी लव्हाटे हा नेहमीच माझ्या मुलासोबत अश्लील चाळे करत होता. त्याचा जाब विचारल्यावर त्याने मारहाण केली. त्यात माझी आणि माझ्या मुलाची कोणतीच चूक नसतानाही त्याने हा हल्ला केला. याची तक्रार बसमालकाकडे केली होती. आम्ही बसही बदलली होती. मात्र, रवीने मुलाला त्रास देणे सुरूच ठेवले होते. - मंगेश पाटील, पालक
>मंगेश यांच्या मुलासोबत ९ महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची कल्पना बसमधील महिला प्रतिनिधीला दिलेली नव्हती. पालकांच्या बैठकीतही याची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. तक्रार आली असती तर योग्य कारवाई करणे शक्य होते.
- हितेंद्र नायक, विश्वस्त, गुरुकुल इंटरनॅशनल