काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार करुन अर्थिक फसवणूक: भोंदू बाबासह त्याच्या पत्नीलाही अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:47 PM2018-12-02T18:47:02+5:302018-12-02T18:56:21+5:30
सासू आणि नणंदेने तुझ्यावर काळी जादू केली आहे, ती उतरविण्यासाठी मी सांगेल तसे कर, असे म्हणत एका ३५ वर्षीय विवाहितेवर गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबा नूर आणि हे कृत्य करण्यासाठी त्याला साथ देणारी त्याची पत्नी रुबीना शेख या दोघांना राबोडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करुन तिची पावणे दोन लाखांची फसवणूक करणारा भोंदू बाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
दहीसर पूर्व भागात राहणारी ही महिला तिच्या एका नातेवाईकाच्या ओळखीने ठाण्यातील दुसरी राबोडीतील कोकणी कब्रस्थान, कोळीवाडा भागातील नूर शेख या भोंदूबाबाकडे २०१५ मध्ये नेले होते. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तुमच्यावर काळी जादू झाली आहे, ती उतरविण्यासाठी काही खर्च करावा लागेल, असे सांगून या विवाहितेकडून एक लाख ४८ हजार रुपये घेतले. तर तिच्या आईकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर तुझ्यावर सासू आणि नणंदेने काळी जादू केली असून ती उतरविण्यासाठी नूर बाबा सांगतील तसे कर, असे त्याची पत्नी रुबिना हिने या महिलेला सांगितले. त्यानुसार तो या महिलेवर २०१५ ते नोव्हेंबर २०१८ या तीन वर्षांच्या काळात तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करीत होता. तिने या प्रकाराला नकार दिल्यानंतर रुबिनाने आपल्याच पतीने केलेल्या घृणास्पद प्रकाराचे नकळत व्हीडीओ चित्रण केल्याचे सांगून तिला पुन्हा तसेच करण्यास भाग पाडले. हे चित्रण व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी तिच्याकडून आणखी ५० हजार रुपये त्यांनी घेतले. तरीही हा व्हीडीओ व्हायरल करुन या महिलेचा पती, मुले आणि आईला ठार मारण्याचीही धमकी दिली. या भोंदू बाबाने आणि त्याच्या पत्नीन अत्याचाराची परिसीमा गाठल्याने अखेर याप्रकरणी या पिडीत विवाहितेने ३० नोव्हेंबर रोजी राबोडी पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार आणि फसवणूकीची तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० नोव्हेंबर रोजी रुबीनाला तर १ डिसेंबर रोजी नूर शेख याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एम. जे. घाडगे या अधिक तपास करीत आहेत.