लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:03 PM2017-08-18T23:03:38+5:302017-08-18T23:04:27+5:30
ठाणे, दि. 18 - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या अशदाफ शेख (२३, रा. कळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मूळची उत्तर प्रदेश, बलिया जिल्ह्यातील ही पीडित १७ वर्षीय मुलगी कळवा परिसरात वास्तव्याला आहे. एका खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीवर असलेल्या अशदाफचे कळव्यात येणेजाणे असल्यामुळे या मुलीशी त्याची ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मार्च २०१७ मध्ये पळवून नेले. त्यानंतर, मार्च २०१७ ते १७ आॅगस्ट २०१७ या कालावधीत त्याने मुंबईच्या गोवंडी परिसरातील बैंगनवाडी भागातील त्याच्या घरात तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, त्याच्या नकळत या मुलीने कळव्यातील आपल्या आईशी संपर्क करून ही आपबिती कथन केली. त्यानंतर, तिच्या आईने कळवा पोलिसांना याबाबतची माहिती देऊन अशदाफविरुद्ध १७ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. ही तक्रार दाखल होताच शेखला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.