बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
By जितेंद्र कालेकर | Published: September 25, 2024 06:49 AM2024-09-25T06:49:34+5:302024-09-25T06:49:43+5:30
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांची मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार
ठाणे : अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेण्यात येत असताना तो अचानक प्रक्षुब्ध झाला. त्यामुळे पोलिसांनी गाडी थांबविली, त्याला पाणी दिले आणि त्याच्या हाताची बेडी काढली. बेडी काढल्याची संधी साधत त्याने पोलिस अधिकारी नीलेश मोरे यांचे पिस्तूल खेचले आणि त्याने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या, असा तपशील गोळीबार करणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये नमूद केला आहे.
तपास पथकातील मोरे यांच्यासह पोलिस हवालदार अभिजित मोरे, हवालदार हरिश तावडे आणि निरीक्षक संजय शिंदे सोमवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास तळोजा मध्यवर्ती कारागृहातून पोलिस व्हॅनने ठाणे गुन्हे शाखेकडे निघाले होते. शिंदे चालकाच्या शेजारी बसले होते. एपीआय मोरे आणि दोन अंमलदार हे अक्षयसह मागे बसले होते. तुम्ही मला पुन्हा का घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे? असे संतापून अक्षय पोलिसांना विचारत होता. एका क्षणी अक्षय प्रक्षुब्ध झाला, तो शिवीगाळ करत असल्याचे चालकासोबत बसलेल्या शिंदे यांना मागच्या पथकाने फोन करून सांगितले. त्यामुळे वाहन थांबवून त्याला पाणी देत शांत करण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आले. आरोपीच्या समोर बसलेल्या तावडे यांच्या बाजूला शिंदे बसले. त्यांच्यासमोर एपीआय मोरे आणि हवालदार मोरे बसले होते. या दोघांमध्ये बसलेला अक्षयने पाणी प्यायल्यावर त्याच्या हातातील बेडी पोलिसांनी काढली. नेमकी हीच संधी साधत त्याने एपीआय मोरे यांचे सर्व्हिस पिस्तूल हिसकावले. मला घरी जाऊ द्या, असे म्हणत त्याने पिस्तूल लोड केले. त्याने एक राऊंड मोरेंच्या दिशेने फायर केला. गोळी मोरे यांच्या मांडीमधून आरपार गेली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर अक्षय आरडाओरडा करू लागला. ‘मला कधी सोडणार’ असे विचारत त्याने तावडे यांच्या दिशेने पिस्तूल रोखत दोन गोळ्या झाडल्या.
सुदैवाने, त्यातील एकही गोळी लागली नाही. अक्षयचा रूद्रावतार पाहून, तसेच तो आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असतानाच शिंदे यांनी एकच गोळी त्याच्या वर्मी मारली. गोळी लागताच अक्षय खाली कोसळला... हा सर्व तपशील शिंदे यांनी तक्रारीत विस्ताराने नमूद केला आहे.
अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर
अक्षयचे हात बेड्यांमध्ये जखडलेले असताना त्याने पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल खेचून गोळ्या कशा झाडल्या, असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीतून उत्तर मिळू शकते, असे मानले जाते.