भाषिक अनुभवांची शिदोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 03:13 AM2018-08-29T03:13:51+5:302018-08-29T03:14:21+5:30
आपल्या सर्वांच्या जीवनात भाषेचे स्थान अद्वितीय आहे. भाषा आपल्या व्यावहारिक, भावनिक आणि वैचारिक जीवनाचा एक असा भाग असते. आपण चालता-बोलता, घरीदारी, क्षणोक्षणी सहजपणे भाषा वापरत असतो. इतके सहज की, आपल्याला त्याची जाणीवही नसते.
आज माणसाची जी काही प्रगती झाली आहे, त्यात भाषेचा वाटा महत्त्वाचा आहे. आपल्या शिकण्याचे माध्यमही भाषाच आहे. आपण आपल्या अनुभवांची मांडणी करून जी ज्ञानाची निर्मिती करतो, त्यातही भाषाच वापरावी लागते. ही भाषा शिकण्याचं ज्ञान मुलांमध्ये उपजतच असते. भाषा समजणे आणि भाषा बोलता येणे या तशा दोन वेगवेगळ्या क्षमता पण त्या निसर्गताच प्राप्त झालेल्या असतात.
बालवयामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर भाषा विकासाचा वेग अतिशय विलक्षण असतो. कुणीही न शिकवता, कोणत्याही प्रकारचे पाठ्यपुस्तक नसताना, कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्र म नसताना किंवा परीक्षाही नसताना लहान मुले सहजपणे ही भाषा आत्मसात करीत असतात. आपल्या घरात, आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींकडून विविध टप्प्यावर मुलांना भाषेचे विविध प्रकारचे अनुभव मिळतात. यातील वयानुसार त्यांच्या ज्ञानेंद्रियाला जे सहजपणे भिडते, त्याकडे मुले लक्ष देतात, ऐकतात व अनुकरण करतात.
भाषा आत्मसात करण्याची विविध संधी या लहान मुलांच्या आजूबाजूला उपलब्ध होत असतात, त्यांनाच भाषिक अनुभव असे म्हणतात. आपल्या आसपासची माणसं जे काही बोलतात, त्यांच्या त्या बोलण्याला एक संदर्भ असतो ते लक्षात घेऊन मुलेही तसे बोलण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपण त्यांचे बोबडे बोल असे म्हणतो. ज्या घरात मुलांसोबत अधिक बोलणे होते ते मूल अधिक लवकर भाषा शिकते. त्यावेळेस आपण मात्र म्हणजे बहुतांशी पालक एक फार मोठी चूक करतात. उगाचच आपणही मुलांसोबत बोबडे बोलतो. जसे पाणी या शब्दाला आपण ‘मम’ असे संबोधून मुलांचा गोंधळ करतो. आपण मोठी माणसे पाणी बोलतो, मात्र त्या लहानांसोबत मम असे का बोलतो. आपण जे बोलतो तेच ऐकून मुले बोलतात हे माहित असूनही आपण असे का बोलतो? याचा विचार करायला हवा. मुलांच्या भाषिक विकासात अधिकाधिक स्पष्ट व शुद्ध बोलण्याचा आग्रह असावा. भाषा आत्मसात करण्याचेही दोन प्रकार आहेत, ते म्हणजे भाषा बोलणे आणि भाषेचे आकलन होणे होय. आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या मेंदूतील डाव्या भागात या दोन्ही प्रकारची केंद्रे आढळतात. लहान मुलांच्या बाबतीत मात्र हे वेगळे असते. मुलाच्या जन्मानंतरच्या साधारणपणे पहिल्या वर्षात ते मेंदूच्या वापराने भाषेला प्रतिसाद देत असते. मात्र हळूहळू ते केंद्र मेंदूच्या डाव्या भागात विकसित होत जाते.
भाषेचे शिकणे होताना मेंदूच्या दोन्ही भागाचा वापर होत असतो. ‘वार्निक’ या भागामुळे भाषेचे ऐकणे व समजणे होत जाते तर ‘ब्रोकाज’ या भागामुळे भाषेचे बोलणे होत जाते. ‘वार्निक’ हे केंद्र आधी विकसित होत असल्याने भाषेचे बोलणे होण्याआधी भाषा समजण्याची प्रकिया आधी घडते. त्यामुळे आपण मुलासोबत अधिकाधिक भाषिक संवाद साधल्यास त्याचा भाषिक विकास चांगला होण्यास मदत होते. मात्र यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तो भाषिक संवाद हा शुद्ध व स्पष्टोच्चारसह असायला हवा आहे. लहान मुलांच्या वयाची पहिली सहा वर्षे ही भाषिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. अधिकाधिक शब्दसंग्रह हा त्यांच्या कानी पडणे अपेक्षित आहे. वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत सुमारे दोनशे ते तीनशे शब्द तर दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस सुमारे तीनशे ते सहाशे शब्दांचा संग्रह होत असतो. त्याद्वारे ते शब्द, वाक्य बनवून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यावेळेस ते अनुकरणाने व्याकरणयुक्त वाक्याची मांडणी करू लागतात.
शब्दोच्चार आणि त्याद्वारे वाक्योच्चार असा हा प्रवास त्यांना भाषा अवगत झाल्यानेच होत असतो. त्यात दुसºयांनी बोललेली भाषा त्यांना समजते आणि मग ते त्याद्वारे आपली भाषेची मांडणी करू लागतात. भाषा आत्मसात करण्याचा वयवर्षे एक ते सहा हा कालावधी खूप वेगवान असतो, म्हणून या कालावधीला भाषा शिकण्याचा ‘संधीचा काळ’ समजला जातो. शब्द, वाक्य, अर्थ, उच्चार याद्वारे भाषेची समज येण्यास मदत होते. संदर्भ लक्षात घेवून, आपले पूर्वानुभव जोडून भाषेची जुळवणी करण्याचा मुल प्रयत्न करीत असते. खरे तर कोणतीही भाषा अवगत करण्याची क्षमता ही या वयातल्या मुलांच्यात निसर्गत: असते, फक्त जी भाषा त्यांच्या कानी पडते, जी भाषा त्यांच्या सोबत बोलली जाते, जी भाषा त्यांच्या अवतीभोवती असते ती भाषा ते लवकर शिकतात. ज्या मुलांना अशा अधिक भाषा शिकायला मिळतात त्यांचा भाषिक विकास जलद होतो. म्हणूनच बाल वयात मुलांना अधिकाधिक भाषिक अनुभवांची संधी मिळवून देणे यासाठी पालक व शाळांनी प्रयत्न केले पाहिजे.
आपल्या शिकण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे भाषा. ती शिकण्याचे ज्ञान मुलांमध्ये उपजतच असते. बालवयामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर भाषा विकासाचा वेग प्रचंड असतो. जी भाषा त्यांच्या कानी पडते, त्यांच्यासोबत बोलली जाते, त्यांच्या अवतीभवती असते ती भाषा ते लवकर शिकतात. ज्या मुलांना अधिक भाषा शिकायला मिळतात, त्यांचा भाषिक विकास जलद होतो. त्यामुळे बालवयात मुलांना भाषिक अनुभव मिळावेत आणि भाषिक अनुभवांची शिदोरी त्यांच्याकडे असावी यासाठी पालक व शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हल्ली मुलांना भाषा विषयातही पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. परंतु संपूर्ण मार्क्स कसे मिळतात, ते ठरावीक विषयाचे गुण आहेत की भाषेतील गुण आहेत, असे प्रश्न निर्माण होतात. लहान वयात ऐकून आणि बोलूनच मुलं भाषा शिकतात. मात्र प्राथमिक शाळांमधून मराठी किंवा तत्सम विषय शिकविताना त्या विषयाचे भाषा शिक्षण व्हायला हवे आणि ते खूप गरजेचे आहे.
च्भाषा शिकण्याच्या चार पायºया आहेत. त्यात प्रथम श्रवण, संभाषण मग वाचन आणि शेवटी लेखन असते. श्रवण व संभाषण हे मुले जरी लहान वयातच घरच्या घरी शिकत असलीत तरी भाषा शिक्षणाचा शास्त्रोक्त आधार असावा म्हणून शाळेतही पुन्हा त्याचे योग्यरीत्या दृढीकरण होते.