बीएसयूपी घरांवर सेनेच्या वर्धापदिनाची छाया
By Admin | Published: June 19, 2017 05:02 AM2017-06-19T05:02:06+5:302017-06-19T05:02:06+5:30
डोंबिवलीच्या इंदिरानगरमधील बीएसयूपी योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमधील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे सोमवारी वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवलीच्या इंदिरानगरमधील बीएसयूपी योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमधील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे सोमवारी वाटप केले जाणार आहे. हा महापालिकेचा कार्यक्रम असताना महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रक काढल्याने मित्रपक्ष भाजपामध्ये नाराजीचे वातावरण आहे. बीएसयुपी लाभार्थ्यांना पालिकेच्या फंडातून घरे मिळत आहेत; शिवसेनेच्या फंडातून नाही अशी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून त्यांनी याप्रकरणी प्रशासनालाही जबाबदार धरले आहे. त्यामुळे सोमवारचा कार्यक्रमात वर्धापनदिनाच्या औचित्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे.
बीएसयूपी लाभार्थ्यांना घरे देण्यास विलंब होत असल्याने गुरूवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगरमधील लाभार्थ्यांनी कुटुंबासह केडीएमसी मुख्यालयावर धडक देत घरे देण्याची मागणी केली होती. त्यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या बैठकीत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल, अशी घोषणा केली. इंदिरानगरच्या४८ लाभार्थ्यांना सोमवारी चाव्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यांच्यासह साठेनगरमधील लाभार्थ्यांना उंबर्डे याठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तेथील बीएसयुपी योजनेतील २४ लाभार्थ्यांनाही त्याचवेळी घरांचा ताबा दिला जाणार आहे, तर कल्याणच्या इंदिरानगरमधील ४० लाभार्थ्यांनाही चाव्या सुपूर्द केल्या जाणार आहेत. सध्या डागडुजीच्या कारणास्तव अत्रे रंगमंदिर बंद ठेवल्याने चाव्यावाटपाचा कार्यक्रम मुख्यालयातील महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.
दरम्यान यासंदर्भात महापौर कार्यालयातून सादर झालेल्या प्रसिध्दीपत्रकावरून नवा वाद उभा राहिला आहे. या पत्रकात केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच १९ जूनला महापालिका परिसरातील पात्र लाभार्थ्यांना बीएसयूपी प्रकल्पातील सदनिकांचे वाटप, अशा आशयाच्या पत्रावर भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम महापालिकेचा आहे, शिवसेना पक्षाच्या फंडातून लाभार्थ्यांना घरे मिळालेली नाहीत. केंद्र व राज्य तसेच महापालिकेच्या फंडातून बीएसयूपी प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारचे प्रसिध्दीपत्रक काढणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी दिली.
लाभार्थ्यांना घरे ही मिळालीच पाहिजे यात दुमत नाही. परंतु शिवसेनेने अवलंबलेली पध्दत चुकीची आहे. हा कार्यक्रम महापालिकेकडून होत असून तो शिवसेनेच्या मंचावर होत नाही. त्यामुळे महापालिकेचा पदाधिकारी म्हणून मी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिवसेनेने घेतलेली भूमिका चुकीची असून प्रशासकीय कार्यक्रमात राजकीय पक्षाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. शिवसेनेने नेहमीच श्रेय लाटण्याचे काम केले असून याला प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी दिली.