शहाड-मुरबाड रस्त्याची रखडपट्टी, उल्हासनगरमध्ये वाहतूककोंडीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:05 AM2019-10-01T01:05:14+5:302019-10-01T01:12:40+5:30
शहाड-मुरबाड रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळाने (एमएमआरडीए) वर्षभरापूर्वी सुरू केले; मात्र रडतखडत सुरू असलेले हे काम अर्धवट स्थितीत आहे.
उल्हासनगर : शहाड-मुरबाड रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळाने (एमएमआरडीए) वर्षभरापूर्वी सुरू केले; मात्र रडतखडत सुरू असलेले हे काम अर्धवट स्थितीत आहे. उल्हासनगरमधून जाणाऱ्या या रस्त्याच्या मधोमध राज्य विद्युत मंडळाचे ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे खांब असल्याने हे काम पुढे सरकत नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या रस्त्याच्या कामात बाधित झालेल्यांनी तेथेच घरे बांधली असून त्याला पालिकेचीही मूकसंमती असल्याची चर्चा आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण परिसरातून जाणाºया शहाड ते मुरबाड या रस्त्याचे काम एमएमआरडीएने एका वर्षापूर्वी सुरू केले. रस्ता रुंदीकरण आणि पुनर्बांधणीसाठी महापालिकेने १८० झाडे तोडण्याची परवानगी एमएमआरडीएच्या कंत्राटदाराला दिली होती. ही झाडे तोडल्यानंतरही रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यावर रस्त्याच्या एका बाजूचे विद्युतखांब आणि रोहित्र अद्याप विद्युत विभागाने हटवले नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे एमएमआरडीएच्या एका अधिकाºयाने सांगितले. रस्ता रुंदीकरणाच्या आड भूमाफिया, नागरिकांनी विनापरवानगी बांधकामे केली आहेत. महापालिकेकडे बाधित व्यापारी व नवीन बांधकामांची यादी उपलब्ध नसल्याचा आरोप शिवसेनेचे उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी केल्याने बांधकामे संशयाच्या भोवºयात सापडली असून चौकशीची मागणी होत आहे. मात्र, पालिकेकडून या बांधकामांवर काहीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहाड ते मुरबाड रस्त्याच्या म्हारळगाव जुना नाका व सेंच्युरी शाळेसमोर वनविभागाची जागा आहे. या जागेत रुंदीकरणाच्या आड भूमाफिये पालिका अधिकाºयांना हाताशी धरून बहुमजली अवैध बांधकामे करत असल्याचा आरोप शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी करून तसे लेखी महापालिकेला निवेदन दिल्याची माहिती दिली. रुंदीकरणाच्या आड उभ्या राहिलेल्या बहुमजली बांधकामांवर तक्रार असतानाही पालिकेने पाडकाम कारवाई का केली नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी वनविभागाच्या जागेवर होत असलेल्या बेकायदा बांधकामांवर आळा घालावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत पालिका येत्या काळात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एमएमआरडीए, महापालिकेकडून हयगय : बोरकर
शहाड ते मुरबाड रस्ता पुनर्बांधणीवेळी रस्त्याच्या मधोमध येणाºया विघुतखांब आणि रोहित्राबाबत एमएमआरडीए आणि महापालिकेने विद्युत मंडळ कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानुसार, विद्युतखांब व रोहित्र हटवण्यासाठी येणाºया खर्चाची माहिती दिली होती.
स्वत: कंत्राटदार नेमून त्यांच्यामार्फत वीजखांब व रोहित्र हटवण्याचे काम करायचे आहे. एमएमआरडीए व पालिकेला दोनदा स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, त्यांनी अद्याप काम केले नाही, असे अभियंता, विद्युत विभागाचे उपकार्यकारी अधिकारी जे.एल. बोरकर यांनी सांगितले.
बाधितांची पुन्हा बांधकामे - शिंपी
शहाड ते मुरबाड रस्त्याचे १२० फुटी रुंदीकरण होऊ न शेकडो जण बाधित झाले. तसेच रुंदीकरणासाठी जुनी १८० झाडे तोडावी लागली आहेत.
या रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांनी बांधकामे केली असल्याचे महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितले.
म्हारळगाव जुना नाक्यासमोरील बांधकामेही बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.