शहापुरात वादळामुळे १२ विजेचे खांब पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:25+5:302021-05-18T04:42:25+5:30
शहापूर : रविवारी रात्रीपासून वाहणारे वादळी वारे आणि पावसाचा शहापूर तालुक्याला तडाखा बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब ...
शहापूर : रविवारी रात्रीपासून वाहणारे वादळी वारे आणि पावसाचा शहापूर तालुक्याला तडाखा बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे खर्डी, कसारा, लेनाड, वेहले, डोळखांब आदी ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, विजेचे १२ खांब पडले असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम रविवारपासून तालुक्यात जाणवत आहे. सोमवारी सकाळी ७ पासून कमी-अधिक प्रमाणात वाहणारे वारे, अधुनमधून कडाडणारी वीज आणि पाऊस, यामुळे दैनंदिन कामकाज, व्यवहारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. तालुक्यातील वेहळे गावात उच्च दाबाचा विजेचा खांब पडला. लेनाड गावात विजेचे खांब पडण्याबरोबरच ताराही तुटल्या. खारीवली गावात वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले आहेत. तालुक्यातील कळमगाव येथील घरावरील पत्रे उडाले आहेत, तर काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क, इंटरनेट बंद पडले आहे. काही भागामध्येे रविवारपासून खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.
------------------
घरांचे छप्पर उडाले
तालुक्यातील कळमगाव येथील रहिवासी विरपन अहमद अजमेरा यांच्या घरावरील पत्रे उडाले असून त्यांचे ४२ हजारांचे नुकसान झाले. कोशिंबडे येथे एका घराचे आणि एका समाज मंदिराचे पत्रे उडाले. पिवळी गावातही समाज मंदिराचे नुकसान झाले. वांद्रे येथील हिंदुरा रतन ठाकरे व महेश भिका जोडे यांच्या घरावरील छप्पर उडून अनुक्रमे १५ हजार ५०० व २२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.