शहापूर, मुरबाडलाही शिशु उपचारांची वानवा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:43 AM2017-09-13T06:43:18+5:302017-09-13T06:43:18+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांच्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आणि इन्क्युबेटरचा तुटवडा असल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघड करताच मंगळवारी खळबळ उडाली. डॉक्टरासंह सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाली. आरोग्यमंत्र्यांनी फोन करून तपशील समजून घेतला, पालकमंत्र्यांनी झाडाझडती घेतली.

Shahapur and Murbad are also involved in infant treatment | शहापूर, मुरबाडलाही शिशु उपचारांची वानवा  

शहापूर, मुरबाडलाही शिशु उपचारांची वानवा  

Next

ठाणे : जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांच्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आणि इन्क्युबेटरचा तुटवडा असल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघड करताच मंगळवारी खळबळ उडाली. डॉक्टरासंह सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाली. आरोग्यमंत्र्यांनी फोन करून तपशील समजून घेतला, पालकमंत्र्यांनी झाडाझडती घेतली.
जिल्ह्यात सर्वत्र मुलांच्या उपचाराबाबत अशी भयावह स्थिती असून कुपोषण आणि बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या शहापूर आणि मुरबाडच्या उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटींलेटर नाहीत, शिशू उपचारकक्षही नसल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील मुलांच्या मृत्यृच्या बातमीनंतर आरोग्य विभाग, झोपी गेलेले खासदार आणि आमदार खडबडून जागे झाले. आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला फोन करून याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. तसेच खासदार, आमदार यांनीदेखील या संदर्भातील माहिती घेतल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. याशिवाय कोणकोणत्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नाहीत, याचीदेखील माहिती या मंडळींनी जाणून घेतली.
शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयात बाळ उपचार केंद्र आहेत. मात्र, नवजात बालकांसाठी आवश्यक असणाºया नवजात शिशू विशेष उपचार केंद्रे नसल्यामुळे त्यांना थेट जिल्हा सामान्य अथवा उल्हासनगर आणि भिवंडी रूग्णालय गाठावे लागत असल्याची माहिती समोर आली.
ठाणे जिल्ह्याची वाटचाल ही हायटेक आणि प्रगतीकडे सुरू आहे. तसेच अनेक सरकारी कार्यालयातील कारभार अद्ययावत पद्धतीने सुरू आहे. परंतु, याच हायटेक आणि स्मार्ट जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र अद्यापही मागास असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयासह दोन उपजिल्हा रूग्णालये आणि सहा ग्रामीण रूग्णालये आहेत. यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात १६ बेडचे नवजात शिशू विशेष उपचार केंद्र आहे.
मात्र संवेदनशील आदिवासी भागात, निमशहरी भागात अजूनही निओनाटल- नवजात शिशुंच्या उपचाराच्या सुविधांची वानवा असल्याचे या घटनेतून ‘लोकमत’ने उघड केले आणि आरोग्याची विदारक परिस्थिती समोर आणली.

उल्हासनगरची अवस्थाही जैसे थे

उल्हासनगर कॅम्प ३ आणि कॅम्प ४ आणि भिवंडी येथील रुग्णालयात १६ बेडस् असे ४ रुग्णालये मिळून सुमारे ६३ बेडस्चे नवजात शिशू विशेष उपचार केंद्र सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. या रु ग्णालयांमध्ये ग्रामीण भागातील नवजात बालकांना उपचार देण्यात येत आहेत.
परंतु, एकाही ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधाच उपलब्ध नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दुसरीकडे, जिल्ह्यातील पाणी देणारा तालुका म्हणुन नावजलेल्या शहापुर तालुक्यासह मुरबाड तालुक्यात मात्र, नवजात शिशू विशेष उपचार केंद्रेच नसल्याने त्या परिसरातील नागरिकांना थेट ठाणे, उल्हासनगर अथवा भिवंडी गाठावे लागत आहे.
त्यामुळे या नवजात बालकांच्या उपचारासाठी या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास एकीकडे तेथील नागरिकांना दिलासा मिळेल तर दुसरीकडे नवजात शिशूचा मृत्यू दर कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यासच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. तसेच या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू विशेष उपचार केंद्रातील बेडस्ची संख्या वाढवून त्याठिकाणी व्हेंटिलेटरची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.

पालिकेच्या कळवा रुग्णालयात सेवा उपलब्ध
एकीकडे जिल्हा रुग्णालयात या सुविधांचा अभाव असतांना दुसरीकडे, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात मात्र अशा प्रकारचा कक्ष असून २० बेडस् त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच व्हेटींलेटरची सुविधादेखील असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. येत्या काळात बेडस्ची संख्या २० वरून ४० करण्यात येणार आहे.

Web Title: Shahapur and Murbad are also involved in infant treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.