मुरबाडच्या तुलनेत शहापूरचा विकास कमी- कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:54 PM2020-11-08T23:54:22+5:302020-11-08T23:54:35+5:30
शहापूरमध्ये झाला लोकार्पण सोहळा
शहापूर : आमदार किसन कथोरे यांच्यामुळे शहापूर आणि मुरबाड या दोन्ही नगरपंचायती एकाच दिवशी स्थापन झाल्या. परंतु, मुरबाडचा विकास ज्या वेगाने झाला, त्या वेगाने शहापूरचा झाला नाही. कथोरे यांची प्रेरणा घेऊनच आता शहापूरचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी ग्वाही खासदार कपिल पाटील यांनी दिली.
पाटील यांच्या खासदार निधीतून नगरसेविका वैदही नार्वेकर यांच्या प्रभागात झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. शहापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि विकासकामांकरिता पक्षीय राजकारण आणणार नाही.
पक्षविरहित विकास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. रजनी शिंदे या भाजपमध्ये असताना त्यांना त्यांच्या प्रभागातील विकासासाठी २० लाखांचा निधी दिला होता. त्यानंतर, लगेच त्या शिवसेनेत गेल्या. पत्र देऊन निधी रद्द केला असता. मात्र तसे केले नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.
जुना आग्रा रोड ते डीएनएस बँकेजवळील मोरेश्वर अपार्टमेंट, जुना आग्रा रोड ते केणेआळी आणि जुना आग्रा रोड ते मुस्लिम मोहल्ला या ठिकाणी एकूण ७४ लाख २७ हजार खासदार निधीतून खर्च करून भूमिगत गटारे आणि काँक्रिटचे रस्ते बनवून पूर्ण केले. यामुळे नागरिकांची साेय हाेणार आहे.
या सोहळ्याप्रसंगी आमदार दौलत दरोडा, आमदार किसन कथोरे, भाजपचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, पंचायत समिती सदस्य सुभाष हरड, नगराध्यक्षा रजनी शिंदे, उपनगराध्यक्ष सुभाष विशे, अशोक इरनक, मुकुंद शिर्के, जगन्नाथ विशे, हिरानंद थेराणी, विजय लिये, किशोर अग्रवाल, किशोर गांधी, किशोर शहा, हरनिश पटेल, हरेश पष्टे, सागर सावंत, प्रज्ञा देशमुख आदी उपस्थित होते.