शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:35+5:302021-09-18T04:42:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वाढते अपघात आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे चर्चेत असलेल्या शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढते अपघात आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे चर्चेत असलेल्या शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करावे. उर्वरित रुंदीकरण भूसंपादनानंतर करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी दिले. संबंधित रस्ता एमएसआरडीसीकडे सोपवून मोठी चूक केल्याचे पाटील यांनी नमूद करीत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
शहापूर-मुरबाड-खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची दुरवस्था, अपुरी कामे आणि भूसंपादनासंदर्भात पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या वेळी आमदार किसन कथोरे, दौलत दरोडा, माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती वंदना भांडे, दशरथ तिवरे आदी उपस्थित होते.
शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्याचे काम केंद्र सरकारने एमएसआरडीसीकडे सोपविल्याने मोठी चूक झाली. या कामाचा दर्जा निकृष्ट असून, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी होेत नाही. अनेक अपघात होत असून, ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत, अशी टीकाही पाटील आणि कथोरे यांनी केली.
या रस्त्याचे काम काही ठिकाणी ३० मीटर करण्यात येत आहे. मात्र, रस्त्याच्या मालकीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुरावेच नाहीत. १९७७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एवढी जागा असणे शक्य नव्हते. त्यामुळे सध्या केवळ सहा मीटर रुंद रस्त्याचे काम पूर्ण करावे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर जमिनी ताब्यात घेऊन करावे, असे आदेश पाटील यांनी दिले. मूळ जमीनमालक आणि सध्या जमिनीवर बांधकाम केलेल्या नागरिकांमधील वादावर स्थानिक नेत्यांनी समन्वय साधून मार्ग काढावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
----------------------