"भोंगे, हनुमान चालीसा नको, आम्हाला पाणी द्या," शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:09 AM2022-05-02T11:09:12+5:302022-05-02T11:09:47+5:30
पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ६५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या डोंगरदऱ्यात चढ-उतार करत आहेत.
श्याम धुमाळ
कसारा : शहापूर तालुक्यात तीन महाकाय धरणे, तर दाेन लहान धरणे असूनही अतिदुर्गम आदिवासी पाड्यांसह काही शहरी भाग पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ६५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या डोंगरदऱ्यात चढ-उतार करत आहेत. त्यामुळे भोंगे, हनुमान चालीसा, ईडीचे राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, अशी साद ग्रामीण भागातील महिलांनी राजकारण्यांना घातली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील बिबलवाडी, चिंतामणवाडी, दांड उंभ्रावणे, नारळवाडी, पारधवाडी यासह दापूरमाळ, सावरकूट, विहिगाव, माळ, उठवा, अजनुप, चांदा, रातांधळे, अनेक गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. या गावातील माता-भगिनी, लहान मुले, गर्भवती माता व घरातील पुरुष मंडळीही सकाळी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. मात्र, गरजेपेक्षा ते फारच कमी आहेत. पाळीव जनावारांसाठी पाणी शोधावे लागते. टँकरचे पाणी प्रतिघर ४ ते ५ हंडे मिळते. राजकारण्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
बिबलवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ बबन ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. बिबलवाडी गावातील ग्रामस्थांना दाेन ते तीन किलाेमीटर उतरून महामार्गाजवळील टाेप बावडीतून पाणी न्यावे लागत आहे. हे हाल राजकारण्यांना दिसत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी केला. लोकप्रतिनिधींना भोंगे, हनुमान चालीसा, ईडी यातच जास्त रस आहे. राज्य असो वा केंद्र सरकार, सध्या कुरघोडीच्या राजकारणात दंग आहेत, त्यांना पाण्यासाठी मरण यातना भाेगणाऱ्या आदिवासींच्या हालअपेष्टांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
- पौष, माघ, चैत्र, वैशाख, आषाढ या महिन्यांत आम्हाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
- लहान-माेठी सर्वच माणसे पाण्यासाठी दाेन किलाेमीटरचा पायी प्रवास दिवसभरात किमान चार वेळा करतात. याच पाणीटंचाईमुळे चार वर्षांपूर्वी माझ्या मुलाचा मृत्यू झाला.
- सर्व राजकारण्यांना विनंती आहे की, तुम्ही भांडणे करा, परंतु आमचा पाणीप्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्या, अशी आर्जव कसारा खुर्दच्या सखुबाई आगिवले यांनी राज्य व केंद्र शासनाला केली.
उन्हाचा तडाखा असला तरी पाण्यासाठी जावे लागते. अनेक गर्भवती, वयोवृद्ध महिला पाण्यासाठी दाेन किलोमीटरपर्यंत चढ-उतार करत असतात. टँकर एकदा येतो. एका टँकरमधून ४ ते ५ हंडे पाणी मिळते.
दुर्गाताई ठाकरे, बिबळवाडी.
आमच्या दांड, उंभ्रावणे परिसरात पाणी अडविण्यासाठी पर्यायी दरी आहे. या ठिकाणी छोटे-छोटे धरणवजा तलाव उभारण्यासाठी मागणी करत आहोत, पण आम्हा आदिवासींच्या या तोंडी मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही.
काशीनाथ मांगे, चिंतामणवाडी.