शहापूर तालुक्याला हवे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:17+5:302021-03-30T04:24:17+5:30
भातसानगर : कोरोनाविषयी सुरुवातीला विशेष माहिती नसल्याने लोकांनी शहापूर तालुक्यामध्ये सुरू केलेले कोविड सेंटर व क्वारंटाइन सेंटर बंद करण्याची ...
भातसानगर : कोरोनाविषयी सुरुवातीला विशेष माहिती नसल्याने लोकांनी शहापूर तालुक्यामध्ये सुरू केलेले कोविड सेंटर व क्वारंटाइन सेंटर बंद करण्याची मागणी केली होती. हे सेंटर तालुक्यात नको, इतरत्र असू द्या, अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, आताच्या घडीला तालुक्यात कोविड सेंटर हवेच, अशी स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
शहापूर तालुक्यामध्ये मागील वर्षी कोरोनाने हाहाकार माजवला. आता पुन्हा तीच चिन्हे दिसत असल्याने आता मात्र आपल्या नातेवाइकांना जवळचे सेंटर असावे, अशी लोकांची भूमिका आहे. त्यानुसार, शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे पुन्हा कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यावर्षी खेड्यापाड्यांपर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या तालुक्यामध्ये कोविड सेंटरची नव्याने लवकरात लवकर सुरुवात करा, अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.
शहापूर तालुक्यातील रुग्णांना थेट सिव्हिल रुग्णालय, भिवंडी येथील सावद किंवा कस्तुरबा वा अन्यत्र न्यावे लागत आहे. त्यामुळे जास्त त्रास होत असल्यामुळे शहापूर तालुक्यामध्ये सेंटर चालू करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धनके यांना विचारणा केली असता त्यांनी यासाठीची मागणी केल्याचे सांगितले. याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता, तालुका आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी त्याचा पाठपुरावा करायला हवा. कोविड सेंटर चालू करणे, हे आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहापूर तालुक्यामध्ये कोविड सेंटर सुरू होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. तालुक्यामध्ये आतापर्यंत १२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यामध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी असली, तरी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेल्या रुग्णांची संख्या कितीतरी अधिक असल्याची माहिती आहे. बहुतांश रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत असून त्यांच्या सल्ल्याने आपापल्या घरांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, या उपचाराशिवाय रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून उपचार करून घ्यावेत, अशा प्रकारची आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
..........
तपासण्यांचा खर्च केल्यापेक्षा मृत्यू बरा
शहापूर तालुक्यामध्ये प्रत्यक्ष कोरोनाचे रुग्ण हे जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यांतील डॉक्टर हजारो रुपये खर्च करायला भाग पाडत आहेत. रक्ततपासणी, अन्य तपासण्या, त्यांचे एक्स-रे, कोरोना टेस्ट आदींचा खर्च सात हजार रुपयांवर गेल्याने एका रुग्णाला धक्काच बसला. सदर रुग्णाने अशी तपासणी करायला लावू नका, अन्यथा मी इथेच मरेन, अशी विनवणी डॉक्टरांना केल्याचे सूत्रांकडून समजले आहे. अशा प्रकारची तपासणी सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने त्यापेक्षा मृत्यू बरा, अशी भूमिका रुग्णांची आहे.