जॉगर्स पार्कला शहीद कौस्तुभ राणे यांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 12:59 AM2019-01-26T00:59:41+5:302019-01-26T00:59:47+5:30
मीरा रोड येथील जॉगर्स पार्कला शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे नामकरण तसेच मीरा रोड रेल्वेस्थानका बाहेर त्यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी शहीद राणे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आला.
मीरा रोड : मीरा रोड येथील जॉगर्स पार्कला शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे नामकरण तसेच मीरा रोड रेल्वेस्थानका बाहेर त्यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी शहीद राणे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आला. महापालिकेच्यावतीने हा कार्यक्रम झाला.
मीरा रोडच्या शीतलनगर मध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे यांना सीमेवर काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये अतिरेक्यांना कंठस्थान घालताना आॅगस्ट मध्ये वीरमरण आले होते. कौस्तुभ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जॉगर्स पार्कला त्यांचे नाव देण्याचा ठराव महासभेने मंजूर केला होता. तर मीरा रोड रेल्वेस्थानका बाहेर कौस्तुभ यांचे स्मारक उभारण्याची मागणी झाली होती. आमदार नरेंद्र मेहता यांनी स्मारक उभारण्यासाठी २५ लाख आमदार निधीतून देण्याचे जाहीर केले होते. नामफलकाचे अनावरण व स्मारकाचे भूमिपूजन कौस्तुभ यांच्या आई ज्योती, वडील प्रकाश, पत्नी कनिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौस्तुभ यांचे नातेवाईक उपस्थित होते.
शहीद कौस्तुभ यांच्या बलिदानाचे सदैव स्मरण रहावे आणि नागरिकांना प्रेरणा मिळत रहावी यासाठी स्मारकाची उभारणी व नामकरण करण्यात आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, आ. मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैतींसह नगरसेवक, पालिका अधिकारी आदी उपस्थित होते.