शहीद कौस्तुभ राणेंच्या वीरपत्नीस 11 लाखांचा धनादेश, वीरमातेची इच्छा वाचून तुम्हीही कराल 'सॅल्यूट'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 09:06 PM2018-09-21T21:06:32+5:302018-09-21T21:07:17+5:30
काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना 7 ऑगस्ट रोजी शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले होते.
मीरारोड (ठाणे) - मीरारोडचे शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च महापालिका करणार असून वीर पत्नीस महापालिकेच्या वतीने 11 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच मीरारोड येथे शहीद राणेंचे हुतात्मा स्मारक उभारणार असून जॉगर्स पार्कला कौस्तुभ यांचे नाव देण्यात येणार आहे. शिवाय कौस्तुभ यांच्या आईच्या सूचनेप्रमाणे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी पालिका अभ्यासिका सुरू करणार आहे.
काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना 7 ऑगस्ट रोजी शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले होते. नुकतीच महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, विरोधीपक्ष नेते राजू भोईर, गटनेते हसमुख गेहलोत आदींनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन महापालिकेच्या वतीने शहीद पत्नी कनिका यांना 11 लाख रुपयांचा धनादेश दिला. आ.मेहतांच्या निधीतून मीरारोड रेल्वे स्थानक समोरील चौकात कौस्तुभ यांचे हुतात्मा स्मारक बांधणार व जॉगर्स पार्कला शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव दिले जाणार आहे. यासाठी भूमिपूजन व नामकरणाचा कार्यक्रम करण्याचा दिवस आदी निश्चित करण्यात आला आहे. कौस्तुभ यांच्या अडीच वर्षाच्या अगस्त्य या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही महापालिका करणार आहे. कुटुंबाने सहमती दर्शवली तर कुटुंबातील एका सदस्याला पालिकेत नोकरी देणार आहे, असेही महापौरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
वीरमातेची मागणी
यावेळी कौस्तुभ यांच्या आईने केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्याची सूचना केली असता, येत्या महासभेत तसा प्रस्ताव देणार असल्याचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्याबद्दल मीरा भाईंदरच्या नागरिकांना सार्थ अभिमान असून महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या प्रति आंदरांजली अर्पण करण्याचा हा पालिकेचा लहानसा प्रयत्न असल्याचे आयुक्त म्हणाले.