शहापूर-मुरबाड: आदिवासीवाडीतील ३४ जणांना पेढ्यांतून विषबाधा, २७ गंभीर, उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:31 AM2017-12-23T02:31:58+5:302017-12-23T02:32:09+5:30
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या संगमेश्वर या गावी पूजेसाठी आलेल्या एका जोडप्याने वाटलेल्या पेढ्यांमुळे तेथील आदिवासीवस्तीतील लोकांना विषबाधा झाली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून विषबाधा झालेल्यांपैकी २७ जण गंभीर आहेत. हे पेढे वाटणाºया जोडप्याचा शोध सुरू आहे.
शहापूर / मुरबाड : शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या संगमेश्वर या गावी पूजेसाठी आलेल्या एका जोडप्याने वाटलेल्या पेढ्यांमुळे तेथील आदिवासीवस्तीतील लोकांना विषबाधा झाली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून विषबाधा झालेल्यांपैकी २७ जण गंभीर आहेत. हे पेढे वाटणा-या जोडप्याचा शोध सुरू आहे.
केलेला नवस फेडण्यासाठी एक जोडपे गुरुवारी संध्याकाळी येथे आले. त्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रसादासाठी आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्समधील एक पेढा पुजाºयाला दिला आणि उरलेले पेढे संगमवाडी या आदिवासीवस्तीत वाटून ते दोघे निघून गेले. मात्र, त्यानंतर येथील नागरिकांना मळमळ, उलट्या तसेच चक्कर येऊ लागल्याने इतर ग्रामस्थांनी त्यांना लगेचच सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे पुरेशी सुविधा नसल्याने त्यांना मुरबाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ३४ बाधितांपैकी २७ जण गंभीर असून त्यांना उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. उर्वरित ७ जणांवर उपचार करून त्यांना शुक्रवारी सकाळी सोडून देण्यात आले. हा प्रकार कळताच मुरबाडचे पोलीस निरीक्षक अजय वसावे आणि तहसीलदार सचिन चौधर हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला आणि हे प्रसाद वाटणारे जोडपे कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेले संगमेश्वर हे खूप पूर्वीपासून नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे. काळू नदी, डोईफोडी नदी तसेच गुप्तरूपाने वाहत असणारी एक नदी अशा तीन नद्यांचा संगम येथे झाल्याने या ठिकाणाला संगमेश्वर हे नाव पडले आहे. भाविक येथे पूजाअर्चा तसेच काही जण दशक्रिया विधी, तर नवस फेडण्यासाठी येतात. येथे शिवमंदिर आहे, त्यामुळे रोजच भाविक महादेवांचा अभिषेक करण्यासाठी येतात तसेच प्रसादाचे वाटपही केले जाते.