नेपाळमधून बंटी-बबलीला अटक करण्यात शहापूर पोलिसांना आले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:44 AM2017-11-17T01:44:20+5:302017-11-17T01:44:46+5:30
दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे.
भातसानगर/शहापूर : दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शहापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
शहापूरलगत असलेल्या चेरपोली येथील आशीषकुमार पोतदार व कुटुंबीय २१ आॅगस्टला अग्रसेन जयंतीनिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्याच वेळी घरकामासाठी असलेले परमबहादूर साही व त्याची बोगस पत्नी शांताबाई या नेपाळी दाम्पत्याने संधी साधून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तब्बल ११ लाख ६५ हजारांवर डल्ला मारून पोबारा केला.
या चोरट्यांमधील जीवन चंद व गोरख शाही या दोघांना शहापूर पोलिसांनी कोपरखैरणे येथे जाऊन काही दिवसांपूर्वी अटक केली.
तर, नेपाळी दाम्पत्यासह आणखी तिघे फरार होते. त्याचा शोध पोलीस घेत होते. त्यानंतर, शहापूरचे पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम, पोलीस हवालदार काशिनाथ सोनवणे, पोलीस नाईक नागरे, पोलीस शिपाई किरण गोरले आणि पोलीसमित्र राहुल राठोड या पथकाला नेपाळ येथे रवाना करण्यात आले.
तब्बल एक महिना नेपाळमध्ये वास्तव्य केल्यानंतर ही घरफोडी उघडकीस आणण्यास शहापूर पोलिसांना यश आले.
पोलिसांनी त्यांच्याकडील तब्बल ४१२ ग्रॅम सोने, ७०० ग्रॅम चांदी व दोन लाख रु पये भारतीय चलन जप्त केले आणि पदम बहादूर साही, बिरमादेवी, राजू कुवर, पूजा एनबहादूर सिंग व दरेंद्र एनबहादूर चंद या चौघांना मुद्देमालासह नेपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम नेपाळ पोलिसांकडे जप्त करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे शहापूर पोलिसांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, शहरात वाढणाºया चोरी, दरोड्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.