शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत, बॅग फेकण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 01:15 PM2017-12-13T13:15:42+5:302017-12-13T13:16:32+5:30
कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली
सुरेश लोखंडे
ठाणे : कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्याची बॅग हिसकवण्याचाही प्रयत्न केला. ठाणे स्टेशन सोडल्यानंतरही या कामगारांची दमदाटी सुरूच होती.
ठाणे येथून रात्री सुमारे 10.15 वाजे दरम्यान ही गाडी सुटलेली असतानाही कामगारांची ही दहशत सुरूच होती.कल्याणला उतरण्यासाठी काही जण आधीच दरवाज्यात आले. त्यांना ही मनमानी लक्षात आली. भीती वाटणारा त्यांचा आवतार पाहून कोणी ही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. यावेळी काही जणांनी एकत्र येऊन ही मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. रात्री - बेरात्री बाथरूमला येणा-या महिला प्रवाशांना देखील या मद्यधूंद कामगारांचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोगीतील टीसी मास्तरला हा प्रकार निदर्शनात आणून दिला.
रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्यांमधील बाथरूम सपाईसाठी खासगी कंत्राटाद्वारे सफाई कामगार ठेवले जात आहेत. पण तसे फारसे उपयुक्त ही ठरत नसलेल्या या कामगारांची दहशत मात्र जीवघेणी ठरत आहे. मद्यधूंद अवस्थेतील हे कामगार बोगीत रात्री बेरात्री कारण नसतानाही हिंडत असतात. त्यांच्यातील काही कर्मचारी गुन्हेगार प्रवृत्तीचे असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे वर्तनही योग्य नसल्याचे आढळून येते. या मद्यधुंद अवस्थेतील कामगारांपासून महिला प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा अतिप्रसंग व चीजवस्तू लांबवण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
मंगळवारी रात्री कल्याण स्टेशन येईपर्यंत या कामगारांचा धुमाकूळ सुरूच होता. ते मोठमोठ्याने आवाजही करीत होते. ते कोणाचे ऐकूनही घेत नव्हते. बोगी क्रमांक 4 मधील हा प्रकार टीसींच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी कामगारांच्या मॅनेजरच्या लक्षात आणून दिले. पण त्यानंतर या कामगारांना उतरवून देणे अपेक्षित होते. पण अशी कोणतीही कारवाई न झाल्याने आणि कामगार गाडीतच असल्याने संबंधीत प्रवाशास या कामगारांची भीती वाटत होती. प्रवासादरम्यान त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता या प्रवाशाकडून व्यक्त करण्यात येत होती.