जलवाहिनी दुरुस्तीसाठी उथळसरचा पाणीपुरवठा आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:32+5:302021-03-06T04:38:32+5:30
ठाणे : ठाण्यातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत कोर्टनाका टाऊन हॉलसमोर भारत गॅस एजन्सीजवळ ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे ...
ठाणे : ठाण्यातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत कोर्टनाका टाऊन हॉलसमोर भारत गॅस एजन्सीजवळ ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे उद्या सकाळी ९ ते रविवारी सकाळी ९ पर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या ठिकाणी कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आता या बंद कालावधीत याचा शोध घेतला जाणार असून, सर्वांना सम प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी यातून प्रयत्न केला जाणार आहे.
येथील १८ मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी २५ वर्षे जुनी झालेली आहे. त्यामुळे ती बंद ठेवून पाणी कुठे जास्त जात आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. या जलवाहिनीवरून जेल, सिद्धेश्वर, गावदेवी जलकुंभाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या शटडाऊनमुळे येथील २० ते २५ हजार नागरिकांना याचा फटका बसणार आहे. परंतु या शटडाऊनमुळे कोणत्या भागाला किती पाणीपुरवठा होतो, कोणत्या भागाला कमी होतो याची माहिती मिळणार असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्यानुसार जेथे पाणी अधिक जात आहे तेथील पाणी ज्या भागांना कमी जात आहे तेथे वळविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
या शटडाऊनमुळे जेल जलकुंभ, सिद्धेश्वर जलकुंभ व साकेत जलवाहिनीअंतर्गत परिसरातील चरई, उथळसर, धोबीआळी, राबोडी, जेल परिसर, साकेत कॉम्प्लेक्स, कोर्ट नाका, खारकर आळी, महागिरी, नागसेननगर, सिडको बसस्टॉप आदी परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.