महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘सातारा पॅटर्न’: शंभूराज देसाई; उपाययोजना करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 08:38 AM2022-10-16T08:38:35+5:302022-10-16T08:38:57+5:30

राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

shambhuraj desai said satara pattern for women safety in the state and suggestion to take action | महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘सातारा पॅटर्न’: शंभूराज देसाई; उपाययोजना करण्याची सूचना

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘सातारा पॅटर्न’: शंभूराज देसाई; उपाययोजना करण्याची सूचना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाण्यात शुक्रवारी एका रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केला. अशा घटना घडू नयेत. महिला, तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना पोलिसांना दिल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी दिली. साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’ राबविण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात शनिवारी बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंह, सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

देसाई म्हणाले की, शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती कळल्यानंतर तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून कारवाईच्या सूचना दिल्या. संबंधित तरुणींनी तक्रार दाखल केल्यानंतर दोन ते तीन पथके बनवून आरोपीचा शोध घेतला आणि रात्री त्याला अटक केली. असे प्रकार वरचेवर घडू नयेत यासाठी शनिवारी पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासच्या परिसरांत साध्या वेशातील महिलांची नेमणूक करणे; तसेच बिट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयातील युवतींसोबत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याकरिता महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढविण्यास सांगितले आहे. 

वाहनांसाठी प्रस्ताव…

साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पोलीस आयुक्तालयास दुचाकी व चारचाकी वाहने व इतर साधनांसाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. 

उपाययोजना करण्याची सूचना

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील ११२ या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ हा राज्यात सर्वात अधिक आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पोलीस जागेवर पोहोचतात. मात्र, शनिवारसारखा दुर्दैवी प्रकार घडू नये, यासाठी व महिला, तरुणींना सुरक्षितता वाटण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

समन्वयाने कारवाई

ठाण्यातील रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या व जादा प्रवासी वाहतूक करीत असल्याच्या प्रश्नांवर पोलीस दल व परिवहन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shambhuraj desai said satara pattern for women safety in the state and suggestion to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.