शांतीनगर अखेर फेरीवालामुक्त!
By admin | Published: May 9, 2016 01:58 AM2016-05-09T01:58:40+5:302016-05-09T01:58:40+5:30
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा आणि काँग्रेसने छेडलेले उपोषण, यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मीरा रोडच्या शांतीनगरमधील बेकायदा
मीरा रोड/भार्इंदर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा आणि काँग्रेसने छेडलेले उपोषण, यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने मीरा रोडच्या शांतीनगरमधील बेकायदा फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे परिसरातील रहिवासी, व्यापारी व वाहनचालाकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या कारवाईत सातत्य राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शांतीनगरमधील सेक्टर-१, २ तसेच परिसरातील रस्ते अरु ंद आहेत. तेथे ना-फेरीवाला क्षेत्र असतानाही फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली होती. नागरिकांना तेथे चालणे अवघड झाले होते. फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी दुकानदार व रहिवाशांनी केली होती. त्यानुसार, काँग्रेसचे सभापती प्रमोद सामंत, जुबेर इनामदार यांनी २७ दिवस पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. परंतु, त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला मिळेल, अशी भीती सत्ताधारी भाजपाला वाटू लागल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणून कारवाई बंद पाडली.
दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, स्थानिक शिवसेना नगरसेवक प्रशांत दळवी, भाजपा नगरसेवक डॉ. नयना वसाणी, दीप्ती भट, सीमा शाह, दिनेश जैन, अश्विन कासोदारिया यांनी तर धरणे आंदोलन करत फेरीवाले हटवण्याची मागणी केली. परंतु, भाजपा सत्तेत असूनही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. दळवी यांनी तर नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा दिलेला इशारा फुसका ठरला. पण, आयुक्तांनी मोठ्या फौजफाट्यासह येथील दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामे जेसीबी लावून जमीनदोस्त करत दळवींना चांगलाच धक्का दिला. दुकानांवर कारवाई झाली, पण फेरीवाले मात्र खुलेआम रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने अनेकांनी दळवी, महापौर जैन, आमदार मेहता यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावला. दरम्यान, काँग्रेसने फेरीवाले हटवण्यासाठी बेमदुत उपोषण सुरू केले. आमदार मुझफ्फर हुसेन, सभापती प्रमोद सामंत यांनी आक्र मक भूमिका घेतली. त्याचबरोबर आमदार सरनाईक यांनीही फेरीवाले न हटवल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा लेखी इशाराच पालिकेला दिला. भाजपाच्या स्थानिक नगरसेवक दीप्ती भट, अश्विन कसोदारिया, दिनेश जैन यांनीही सरनाईक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याबाबतचे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)