शरद पवार यांनी अशी केली आपल्या आमदारांची सुटका, गुडगावच्या हॉटेलमध्ये होते नजरकैदेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:10 AM2019-11-26T07:10:54+5:302019-11-26T07:11:21+5:30
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते तथा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या काही आमदारांना देशातील काही भागांत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते.
- नारायण जाधव
ठाणे : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते तथा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या काही आमदारांना देशातील काही भागांत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते. त्यातील नितीन पवार, दौलत दरोडा, अनिल पाटील आणि अण्णा बनसोडे यांना गुडगाव येथील हॉटेल ओबेरायमध्ये प्रचंड बंदोबस्त आणि भाजप कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत ठेवले असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना मिळताच त्यांनी तत्काळ आपली सूत्रे हलवून काँगे्रस नेते अहमद पटेल यांना फोन करून या आमदारांची सुखरूप सुटका केली. या मोहिमेत मूळचे हरयाणाचे असलेले नवी मुंबईतील काँगे्रस नेते तथा शहराचे माजी उपमहापौर अनिल कौशिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना कौशिक यांनी सांगितले की, पवार यांनी अहमद पटेल यांनी ही बाब सांगितल्यानंतर पटेल यांनी तत्काळ आपल्याशी संपर्क साधला. तेव्हा आपण जयपूर येथे होतो. परंतु, तत्काळ गुडगावला येऊन हॉटेल ओबेरॉय गाठले. तेथे किमान दीडशे पोलीस आणि पाचशेच्या आसपास भाजप कार्यकर्ते होते. मात्र,आपण भूपेंद्र हुड्डा व सुखवीर कटारियांना सांगून आणि स्थानिक हरयानवी भाषेत पोलिसांशी चर्चा करून थेट हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवले होते, तो परिसर गाठला. तेथे हे आमदार हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ओएसडी जवाहर यादव यांच्या ताब्यात होते. मात्र, आपण थेट दौलत दरोडा यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधला. तेव्हा यादव यांना आश्चर्य वाटले. मात्र, आपण जरी हरयाणाचे असलो, तरी महाराष्ट्रात रायगडमध्ये आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने उत्तम मराठी बोलतो, असे सांगितले.
तसेच हे आमदार राष्ट्रवादीचे नसून शिवसेनेचे आहेत, असे भासविले. त्यानंतर एकेक करून अनिल पाटील आणि नरहरी झिरवळ यांना आपल्याला शरद पवारसाहेबांनी पाठवले आहे, असे सांगून विश्वासात घेऊन त्यांना हॉटेलमध्ये एका सुरक्षित ठिकाणी जायला सांगितले. त्याअगोदर नितीन पवार यांनी आपली सुटका केलेली होती. तेथे स्थानिक काँगे्रस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहण, धीरज शर्मा उपस्थित होते. तेथून निघताना पोलिसांनी पुन्हा अडवले. मात्र, स्थानिक हरयानवी भाषेत त्यांना दम भरून सरळ गाड्यांमध्ये बसवून पवारसाहेबांनी सांगितलेल्या ठिकाणी नेले. तेथून टर्मिनल-२ गाठून या आमदारांना मुंबईत सुरक्षित पाठवले, असे कौशिक यांनी सांगितले. अशा पद्धतीने शरद पवार यांनी अहमद पटेलांना फोन करून आणि आपल्या तेथील कार्यकर्त्यांना सांगून या तिन्ही आमदारांची सुखरूप सुटका केली. यात अण्णा बनसोडे मात्र अजूनही संपर्काबाहेर असून त्यांचाही लवकर शोध लागेल, असे ते म्हणाले.
गुडगावच्या हॉटेल ओबेरायमध्ये किमान दीडशे पोलीस, पाचशेच्या आसपास भाजप कार्यकर्ते होते. मात्र, कौशिक यांनी भूपेंद्र हुड्डा व सुखवीर कटारियांना सांगून आणि स्थानिक हरयानवी भाषेत पोलिसांशी चर्चा करून थेट हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवले होते, तो परिसर गाठला.