शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठामपा मुख्यालयासमोर कचरा

By अजित मांडके | Updated: March 19, 2025 12:26 IST2025-03-19T12:26:08+5:302025-03-19T12:26:59+5:30

ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो.

Sharad Pawar group's city president throws garbage in front of the Shakhapa headquarters | शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठामपा मुख्यालयासमोर कचरा

शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठामपा मुख्यालयासमोर कचरा

ठाणे :  ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात  कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाही. त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला. 

शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला.   

दरम्यान, महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही व त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे. जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Sharad Pawar group's city president throws garbage in front of the Shakhapa headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.