"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 12, 2024 09:56 PM2024-05-12T21:56:42+5:302024-05-12T21:58:25+5:30

Lok Sabha Election 2024: कळव्यात रविवारी आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना राज पुढे म्हणाले की, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या‘ये फेव्हिकॉल का जोड है’ या वक्तव्यार राज यांनी ही जोड पुढच्यावेळी आतून लावा' अशा शब्दांत टोमणा मारला.

"Sharad Pawar started politics of vandalism", comments Raj Thackeray, Lok Sabha Election 2024 | "फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 

"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 

Raj Thackeray : ठाणे : फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवार यांनी सुरू केली. त्यांनी प्रथम काँग्रेस फोडले आणि नंतर पुलोद स्थापन केले. १९९१ साली याच पवारांनी भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली, त्यांचे आमदार फोडले. नारायण राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेनाना फोडली. या फोडाफोडीबाबत आजचे नेतृत्व याआधी टाहो फोडताना दिसत नव्हते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

कळव्यात रविवारी आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना राज पुढे म्हणाले की, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या‘ये फेव्हिकॉल का जोड है’ या वक्तव्यार राज यांनी ही जोड पुढच्यावेळी आतून लावा' अशा शब्दांत टोमणा मारला. आनंद मठात गेल्यावर आनंद आश्रमातील जुने दिवस आठवल्याचे सांगत आनंद दिघे यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा पुन्हा एकदा त्यांनी समाचार घेतला. बाहेरचे लोंढे येण्याचे सर्वाधीक प्रमाण ठाणे जिल्ह्यात असून हे लोंढे जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत कोणताही विकास होणार नाही. तलावांचे शहर बुजवून आता ठाणे हे टँकर शहर झाले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या एका जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही भावी खासदारांनी हे मुद्दे लोकसभेत मांडावे असा सल्ला त्यांनी दिला. आतापर्यंतची कोणताही विषय नसलेली ही लोकसभा निवडणूक आहे. लोकांच्या जीवनमरणाचे विषय सोडून वडील चोरले या विषयावर बोलले जात आहे. फोडफोडीचे राजकारण मान्य नसल्याचे पुन्हा एकदा ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. 

अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद मोदी, शहांनी दिले नाही म्हणून उद्धव हे युतीतून बाहेर पडले मग ज्यावेळी त्यांच्यासमोरच मोदी, शहा यांनी जाहीर भाषणातून पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे म्हटले त्यावेळी का नाही त्यांनी आक्षेप घेतला असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. हल्ली कोण कोणाच्या पक्षात आहे हे कळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मोदींच्या चांगल्या गोष्टी या मान्य कराव्याच लागतील असे ते म्हणाले. देशविघातक गोष्टींकडे लक्ष द्या पण यात चांगला मुसलमान भरडला जाणार नाही असे शिंदे, म्हस्के या उमेदवारांसह इतर सर्व खासदारांना त्यांनी सांगितले. तसेच, येणाऱ्या लोकसबेत या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले.

पुन्हा एकदा राज यांचा लाव रे तो व्हिडीओ
सुषमा अंधारे यांनी पुर्वी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा व्हिडीओ या सभेत राज यांनी लावला आणि बाळासाहेबांवर वक्तव्य करणाऱ्या अशा व्यक्तीला प्रवक्ती करुन वडिलांवर प्रेम असल्याचे सांगतात अशा शब्दांत उद्धव यांच्यावर त्यांनी टीका केली.

Web Title: "Sharad Pawar started politics of vandalism", comments Raj Thackeray, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.