मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या संपकरी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ बैठकीत असणार शरद पवार!
By सुरेश लोखंडे | Published: December 19, 2023 08:09 PM2023-12-19T20:09:36+5:302023-12-19T20:10:42+5:30
मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे: बालकांसह कुपाेषीत बालकांना ताजा व पाेषक पाेषण आहार गेल्या १६ दिवसांपासून मिळत नाही. या पाेषण आहाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बालकांची काळजी घेत बेमुदत संपावरील अंगणवाडी सेविकांचा संप मिटवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नेते ॲड. एम.ए. पाटील, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासह विविध मंत्री, नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन संपाची दखल घेण्यास सांगत आहे.
यानुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळात स्वत: येण्याचे आश्वासन देऊन कळकळ व्यक्ती केली, असे येथील या संघाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी लाेकमतला सांगितले. मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. त्याचा आजचा १६ वा दिवस आहे.