स्वा. सावरकरांचे पत्र विचारात न घेतल्याने देश आज अडचणीत, शरद पोंक्षे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:10 AM2019-12-03T05:10:03+5:302019-12-03T05:10:24+5:30
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला.
डोंबिवली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पंडित नेहरू यांना पत्र पाठवून काही गोष्टी तातडीने करण्यास सांगितल्या होत्या. त्यात पहिला मुद्दा हिंदुस्थान हा एक खंडप्राय देश होता, तो एक राष्ट्र म्हणून उभा राहिला पाहिजे. जगातील सर्व देशांना हिंदुस्थान कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो, हे स्पष्ट समजले पाहिजे. त्यासाठी सीमारेषाही ठळक असल्या पाहिजेत. पण, त्याकडे तत्कालीन सरकारने लक्ष न दिल्याने आज आजूबाजूच्या देशातील नागरिक कधीही आपली सीमारेषा ओलांडत आहेत. त्यांना रोखण्याचे आव्हान आहे, अशी टीका अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी केली.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. टिळकनगर शाळेच्या पटांगणात रविवारी हा कार्यक्रम झाला. पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह व ५१ हजार रु. रोख असे होते. यंदा या पुरस्काराचे १८ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर पोंक्षे यांनी ‘सावरकर विचार दर्शन’ यावर विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी आशीर्वाद बोंद्रे, डॉ. महेश ठाकूर, श्रीकांत पावगी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सावरकरांचे न ऐकल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिक भारतात घुसखोरी करत आहेत. देश बलवान व महासत्ता होण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी व्यक्ती आणि अंतर्गत सुरक्षा पाहणारे पोलीस दलातील व्यक्ती सक्षम असणे गरजेचे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मेरिट मिळविणाऱ्या मुलांच्या मुलाखती माध्यमांवर प्रसारित केल्या जातात. पण, त्यातील किती मुले आम्हाला शिक्षक, सैनिक आणि पोलीस व्हायचे आहे, असे सांगतात? कारण, त्यांना आपण सक्षम केले नाही. २५ वर्षांपूर्वी शिक्षकीपेक्षाला जो मान होता, तो आता उरलेला नाही. सावरकरांचे विचार अमलात आणले असते, तर आज देश कुठच्या कुठे प्रगती करू शकला असता’, असे पोंक्षे म्हणाले.
सप्तसिंधू नदीच्या तिरावर राहणारे ते हिंदू. हिंदू धर्म आहे, संस्था नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही. एका माणसाने दुसºया माणसाशी माणुसकीने वागणे म्हणजे हिंदू असणे आहे. मी हिंदू आहे, त्यातच सेक्युलर असणे आहे. हिंदुत्ववादी संघटनांना आम्ही सेक्लुरवादी आहे, हे बोलण्याची गरज नाही. कारण, आमच्या रक्तात आम्ही सेक्युलरवादी आहोत हे आहे. सेक्युलरालिझम म्हणजे धर्माची लुडबुड. ती दररोजच्या जीवनात चालणार नाही. जे पक्ष आपण सेक्युलर आहे, असे बोलतात, ते याप्रमाणे वागतात का, ते तुम्ही पाहा. बाकी सगळे धर्म नाही. धर्म संस्था आहेत, असे पोंक्षे म्हणाले.
आयुष्यभर देवाची पूजा न करणाराही हिंदू असतो, हेच हिंदू धर्माचे सौंदर्य आहे. हिंदूंची ओळख मी उत्तम माणूस आहे. गणवेश घालून आम्हाला फिरवावे लागत नाही. हा हिंदू धर्म जातीपातीत विखुरला गेला आहे. जातीच्या भिंती तोडून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे. सावरकरांची लढाई मनुष्यधर्मासाठीची होती. सावरकरांचे अंतिम ध्येय कोणी विचारले तर त्यांनी सांगितले होते की, माझी जात मनुष्य, धर्म माणुसकी व देशाचे नाव पृथ्वी सांगायला आवडेल. पण, त्यापूर्वी सर्वांना एकत्र आणले पाहिजे, असे ते म्हणाले.
- इंग्रजी भाषेत स्वर आणि व्यंजने मिक्स आहेत. कुठे उच्चार सायलेंट होतात, हे असे आपल्या भाषेत काही नाही. आपली भाषा स्पष्ट आहे, म्हणून तिचा अभिमान बाळगा. एखाद्या भाषेचा अभिमान का बाळगावा, त्याचे ठोस कारण पाहिजे.
भाषेसाठी सावरकरांची पुस्तके वाचा. शिवाजी महाराजांनंतर भाषा शुद्धीकरणाचे काम सावरकरांनी केले आहे. दूरदर्शन, महाविद्यालय, विधिमंडळ, मुख्याध्यापक हे सर्व शब्द आपल्याला सावरकरांची देण आहे, असे पोंक्षे म्हणाले.