खडकपाडा पोलीस ठाण्याचा १५ सप्टेंबर पूर्वी श्रीगणेशा
By admin | Published: August 25, 2015 11:02 PM2015-08-25T23:02:45+5:302015-08-25T23:02:45+5:30
कल्याणात नव्या सुरू होणाऱ्या खडकपाडा पोलीस ठाण्याला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत त्याचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- पंकज रोडेकर, ठाणे
कल्याणात नव्या सुरू होणाऱ्या खडकपाडा पोलीस ठाण्याला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत त्याचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याची संख्या ३४ होणार आहे.
कल्याण शहरातील खडकपाडा परिसराचा गेल्या वर्षापासून झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे येथे पोलीस ठाणे असावे, अशी मागणी होऊ लागली होती. याचदरम्यान, तत्कालीन मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या त्या पाठपुराव्याला यश आले होते. ३ मार्च २०१४ रोजी त्या पोलीस ठाण्याला गृह विभागाकडून हिरवा कंदील मिळाला होता.
या नव्या पोलीस ठाण्यामुळे बाजारपेठ आणि महात्मा फुले या पोलीस ठाण्याची हद्द कमी होणार आहे. पोलीस ठाण्याची इमारत महापालिकेच्या आरक्षित जागेत उभारली आहे. ती तळ अधिक तीन मजली आहे. मात्र, मंजूर नसलेल्या मनुष्यबळामुळे हे पोलीस ठाणे सुरू करण्यास मुहूर्त लागत नव्हता. आता ते मंजूर झाल्याने लवकर हे पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तालयातील तीन नंबरचे परिमंडळ असलेल्या कल्याण झोनमध्ये सध्या सात पोलीस ठाणी आहेत. त्यामधील चार पोलीस ठाणी ही डोंबिवलीत असून तीन कल्याण शहरात आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याने कल्याण शहराबरोबर परिमंडळात पोलीस ठाण्याची संख्या एकने वाढणार आहे. याच नव्याने सुरू होणाऱ्या ठाण्याच्या हद्दीत अप्पर पोलीस आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त कार्यालये आहेत.
याबाबत लवकरच अधिसूचना काढून खडकपाडा पोलीस ठाणे सुरू करण्यात येईल. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत ते सुरू करण्याचा प्रयत्न आहे.’’
- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण,
सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर