कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:37 AM2020-08-01T01:37:49+5:302020-08-01T01:38:08+5:30
पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर रिक्तपदांमुळे अतिरिक्त ताण : दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त
हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी २२ कोविड केअर सेंटर, ५ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि ४ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल अशा ३१ संस्थांची निर्मिती करून साथीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया- अंतर्गत ३ उपजिल्हा रुग्णालये व ९ ग्रामीण रुग्णालयांतर्गत कामकाज चालविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेवर रिक्त पदांमुळे मोठा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली जात नसल्याने आरोग्य सेवेवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या खाली ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३१२ उपकेंद्रे अशी भक्कम फळी उपलब्ध आहे. या केंद्रात महिन्याला सुमारे ४५ ते ५० हजार बाह्य रुग्ण सेवेसाठी येत असतात.
जिल्हा निर्मितीला पाच वर्षे लोटली असून रिक्त पदांची पूर्तता करून घेण्यास कुठल्याही सरकारला शक्य झालेले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक विभागांतर्गत एकूण ५०७ मंजूर पदांपैकी ३३८ पदे भरली गेली असून १६९ पदे रिक्त असल्याने उपलब्ध वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, परिचारिका आदींवर मोठा अतिरिक्त ताण पडत आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या अंतर्गत १ हजार ७१२ मंजूर पदांपैकी १ हजर २१५ पदे भरली असून ४९७ पदे रिक्त आहेत. रुग्णांना महत्त्वपूर्ण सेवा बजावणाºया वैद्यकीय अधिकारी श्रेणी अ व ब गटातील २९ पदे रिक्त असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उभारलेल्या ३१ कोविड केंद्रातील उपचारासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी पुढे येत आहेत.
तालुकानिहाय उपलब्ध रुग्णवाहिका
पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत.
पालघर (५), वसई (१०), जव्हार (४), डहाणू (९),
तलासरी (५), वाडा (८), विक्रमगड (३), मोखाडा (२)
जिल्हा शल्य चिकित्सक
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची साथ निर्माण झाल्यानंतर बाधित रुग्णांवर उपचारासाठी २९ संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १२ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील नॉन-कोविड रुग्णांच्या सेवेला कुठलाही धक्का न लावता अविरत सेवा पुरविली जात आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असून दर १५ दिवसांनी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
- डॉ. कांचन वानेरे,
जिल्हा शल्यचिकित्सक
आॅक्सिजन पुरवठा
आॅक्सिजन पुरवठा व्यवस्थेतील गळतीच्या समस्या असून ४० व्हेंटिलेटरच्या पुरवठ्याबाबतही काहीशी अशीच समस्या असल्याच्या तक्रारी आहेत. निकृष्ट जेवण, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची व्यवस्था, बेड व्यवस्था आदीबाबत रुग्णांच्या कुरबुरी काही प्रमाणात सुरूच राहिल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येने पंधरा हजारांचा टप्पा पार केला असून त्यावर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून रेमेडीसीवीर व वॅसिलोझुमिव्ह या प्रभावी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.