सराफा घोटाळा शेकडो कोटींच्या घरात? लोकप्रतिनिधींही गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 05:30 AM2018-11-13T05:30:58+5:302018-11-13T05:31:48+5:30
आरोपीच्या अटकेसाठी दोन पथके तैनात : गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश
अनिकेत घमंडी
डोंबिवली : येथील मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे मालक अजित कोठारी यांनी केलेल्या घोटाळ्याचा आकडा शेकडो कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २४ जणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यापैकी केवळ नऊ जणांनी तक्रार दिली आहे. त्यामुळे फसवणुकीचा नेमका आकडा आताच सांगता येणार नसला, तरी जसजसे तक्रारदार पुढे येतील, तसतसा हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी दुकानासमोर फलक लावला असून ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रथमेश ज्वेलर्सकडे ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्यामध्ये शहरातील प्रख्यात राजकारण्यांचाही समावेश आहे. त्यांची नावे मात्र सांगण्यात आली नाहीत. फरार अजित कोठारी याच्या तपासासाठी रामनगर पोलिसांनी दोन पथके तैनात केली आहेत. कोठारीचा मोबाइल बंद असला, तरी ईएमआय क्रमांकावरून त्याचे कॉल रेकॉर्ड मागवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची बँक खाती, त्यात झालेली उलाढाल आदींबाबतची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी सांगितले. त्याच्या पत्नीच्या किंवा नातलगांच्या नावाने कुठे व्यवहार झाले आहेत का, याची पाहणी करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले. आतापर्यंत नऊ जणांनी तक्रार दिली असून त्यानुसार दोन कोटी ५६ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. अन्य २४ जणांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा आता सात कोटींच्या घरात जात आहे. कोठारी याचे फोन कनेक्शन्स तपासण्यात येत असून कोणाकोणाशी त्याचे संभाषण झाले आहे, याबाबत तपास सुरू आहे. त्यानुसार, सर्व संशयितांना बोलावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कोणताही परवाना नसताना आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून पैसे घेणे, सोन्याची गुंतवणूक तसेच भिशी योजनेचे आमिष दाखवून कोठारी याने ग्राहकांकडून गुंतवणूक करून घेतली. पवार यांच्या सांगण्यानुसार कोठारी याने दुबईसह मुंबई व अन्य ठिकाणी बांधकामासाठी पैसे गुंतवल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या व्यवहारात त्यांना नुकसान झाले असून काही व्यवहार फसल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली असण्याची शक्यता असल्याचेही पवार यांनी सांगितले.
पोलिसांनी आजूबाजूच्या व्यावसायिकांशी चर्चा केली असता तीनचार महिन्यांपासून कोठारी यांना व्यवसायात नुकसान झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले असून देणी कशी द्यायची, हा पेच त्यांच्यासमोर होता. त्यामुळे ते फरार झाले असावेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सराफा व्यावसायिकांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात इतर सराफ व्यावसायिकही अवैधपणे व्याजाचा धंदा करत आहेत. भिशी योजनेत ग्राहकांचीच मागणी सर्वाधिक असते. वर्षाकाठी ११ महिने ठरावीक रक्कम भरायची आणि बाराव्या महिन्याची भिशीची रक्कम न भरता एखादा दागिना मिळवण्याचे महिलावर्गाला आकर्षण असते. त्यामुळे विविध आकड्यांच्या टप्प्यांमध्ये ही गुंतवणूक केली जात आहे. ती अवैध असली तरी सर्वसामान्य ग्राहकाला विविध योजनांच्या आकर्षणाची भुरळ पडतेच. याआधीही भिशीच्या योजना बुडाल्याचे सर्वश्रुत आहे.
हमरस्त्यावरील सराफा दुकान बंद असले, तरी पोलिसांनी अद्याप ते सील केलेले नाही. ते सील करण्याची आणि दुकानातून काही माहिती मिळते का, ते बघण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी अद्याप परवानगी दिलेली नसून परवानगीनंतरच त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे पवार म्हणाले.
शहरात काही बांधकाम व्यावसायिकांमध्येही हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत बोलीभिशी, चिठ्ठीभिशी सुरू आहेत. त्यादेखील अवैध असल्या तरी त्याची चर्चा होत नाही. त्यात कोणा व्यावसायिकाचे नुकसान झाले, तरी त्याचाही फारसा बोलबाला होत नसल्याचे सांगण्यात आले.