खंडणीचा कट यशस्वी होण्यासाठी ‘तिने’ पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती....
By जितेंद्र कालेकर | Published: July 15, 2018 11:30 PM2018-07-15T23:30:45+5:302018-07-15T23:30:45+5:30
व्यापाऱ्याला आधी ‘सेक्स’च्या जाळयात अडकवून नंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ओलीस ठेवत दोन लाखांची खंडणी उकळणा-या रॅकेटमधील तरुणीने व्यापा-याच्याच विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्याची बाब उघड झाली आहे.
ठाणे: नंदूरबारच्या व्यापा-याला लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची धमकी देत त्याच्याकडून दोन लाख दहा हजारांची खंडणी उकळणा-या ‘त्या’ तरुणीने हा कट सफल होण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी त्याच व्यापा-याच्या विरुद्ध तक्रारही केली होती. या तरुणीसह तिला मदत करणारा रिक्षा चालक तसेच येऊरच्या बंगल्यावर आलेले अन्य दोघेजण असे कोणीही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन (२२) आणि त्याचा मित्र एजाज नुरू (२३) या दोघांना खंडणीसाठी ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार ९ आणि १० जुलै रोजी घडला. रिजवानकडून खंडणी उकळण्यासाठी त्याला आधी सोहेल पंजाबीच्या मैत्रिणीमार्फत ‘सेक्स’च्या जाळ्यात अडकविण्यात आले. ९ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ‘त्या’ तरुणीसोबत ते येऊरला गेले. तेंव्हा त्यांना येऊरला नेणाºया रिक्षा वाल्यानेच बंगल्याची सोय करुन दिली. त्याबदल्यात त्याने चार हजार रुपये सांगितल्यानंतर त्याला एक हजार रुपये रिजवानने दिले. बंगल्यावर त्यांच्यात ‘सबंध’ आल्यानंतर दुसºयाच मिनिटांत तिथे दरवाजावर दिपक वैरागडसह तिघांनी थाप मारीत धाड टाकली. त्यानंतर दोघा कथित पोलिसांनी त्याच रिक्षा चालकासह तिला तक्रार देण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नेले. तर रिजवान आणि बंगल्याबाहेर थांबलेला एजाज यांना दिपकने दम देण्यास सुरुवात केली. त्यावेळी दिपकने रिजवान आणि एजाजला वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्याला बाहेरच बसवून पुन्हा धमकावून त्याच्याकडून दहा हजार रुपये काढले. नंतर त्याला आणखी दहा लाखांच्या रकमेसाठी धमकविण्यात आले. त्यासाठी त्याला काल्हेर येथील लॉजवर ठेवून दिपकने त्यांना ९ जुलैच्या रात्री त्यांच्यावर टेहाळणी केली. दुसºया दिवशी १० जुलैला पुन्हा त्यांना ताब्यात घेऊन वाशीला दोन लाख रुपये आणण्यासाठी नेल्यानंतर दरम्यानच्याच काळात या कटातील ‘त्या’ तरुणीने मंगळवारी रिजवानविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार (एनसी) दाखल केली. त्यामुळे आपली तक्रार कशी खरी आहे, हे भासवून त्यांना रिजवानकडून पैसे काढता, येणे शक्य होईल, असा त्यामागे हेतू होता. वाशी येथून भाडयाच्या कारने ही टोळी रिजवानसह वर्तकनगर येथे आल्यानंतर त्यांनी दोन लाखामधील ५० हजार रुपये तसेच आदल्या दिवशीचे दहा हजार रुपये कोणाला दिले? याचाही शोध सुरुच आहे. दरम्यान, दिपक वैरागड आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी या दोघांनाही शनिवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. रिक्षा चालक, साहेलची मैत्रिण आणि अन्य दोघे अशा चौघांचाही अद्याप शोध सुरुच असल्याचे पोलिसांनी सांगितले.