Ulhasnagar Building Slab Collapse: वडिलांना जेवण आणण्यासाठी गेल्याने 'ती' बचावली; डोडवाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:21+5:302021-05-16T11:22:13+5:30
उल्हासनगर : दुर्घटनाग्रस्त झालेल्या मोहिनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भाड्याने राहत असलेल्या हरेश डोडवाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. वडिलांना जेवण ...
उल्हासनगर : दुर्घटनाग्रस्त झालेल्या मोहिनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भाड्याने राहत असलेल्या हरेश डोडवाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. वडिलांना जेवण आणण्यासाठी लहान मुलगी अमिषा आत गेल्याने तिचा जीव वाचला. अमिषा बँकिंग कोर्स करीत असून, मृत्यू झालेली मोठी बहीण ऐश्वर्या नुकतीच सीए झाली होती.
उल्हासनगर कॅम्प नं.१ परिसरातील मोहिनी पॅलेस इमारतीला काही वर्षांपूर्वी महापालिकेने नोटीस देऊन रिकामी केली होती. इमारत दुरुस्त केल्यानंतर फ्लॅटधारकांनी इमारतीमध्ये भाडेकरू ठेवले होते, अशी माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. इमारतीच्या मागच्या बाजूच्या पाचव्या मजल्यावर हरेश डोडवाल हे पत्नी संध्या, मुलगी ऐश्वर्या व अमिषा यांच्यासह राहत होते, तर तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर कुणीही राहत नसल्याने ते रिकामे होते. पहिल्या मजल्यावर पारचे कुटुंब राहत होते. त्या कुटुंबातील हॉलमध्ये बसलेल्या सावित्री पारचे (६०) व मॉन्टी पारचे (१२) यांचा मृत्यू झाला. हरेश यांचा पूर्वी स्वतःचा एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय होता. तो बंद झाल्यावर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या कल्याण येथील विष्णू हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करीत होते.
हरेश शनिवारी दुपारी घरी आल्यानंतर पत्नी संध्या, मुलगी ऐश्वर्या व अमिषा यांच्याशी गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांना भूक लागल्याने, त्यांनी लहान मुलगी अमिषा हिला जेवण गरम करून आणण्यास सांगितले. अमिषा जेवण आणण्यासाठी जाताच हॉलमधील स्लॅब कोसळला. यामध्ये हरेश, संध्या व ऐश्वर्या यांचा मृत्यू झाला. ऐश्वर्या ही नुकतीच सीए परीक्षा पास झाली होती, तर अमिषा बँकिंग कोर्स करीत आहे. मोठा आवाज झाल्याने अमिषा धावत हॉलकडे आली तेव्हा स्लॅब कोसळून वडील, आई व बहीण ढिगाऱ्याखाली दबल्याचे लक्षात आले. तिने खाली उतरून शेजारी राहणाऱ्या काकांकडे धूम ठोकली. एका क्षणात डोडवाल कुटुंब उद्ध्वस्त झाले. वडिलांसाठी जेवण करण्यासाठी किचनमध्ये गेलेली अमिषा बचावली असून तिचे पुढील भविष्य अंधाकारमय झाले आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष पुरस्वानी यांनी अमिषाला धीर दिला.
महापालिकेकडून हवा मदतीचा हात
मोनिका पॅलेस इमारत दुर्घटनेत डोडवाल व पारचे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. महापालिकेने मृत्यू झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.