दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘ती’ बनवते आत्मनिर्भर आणि स्वावलंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:59 PM2020-09-06T23:59:12+5:302020-09-06T23:59:28+5:30
शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना शक्य तितके स्वत:चे काम स्वत: करायला लावून स्वावलंबी बनवतात.
स्नेहा पावसकर
ठाणे : दिव्यांग मुलांनाही सर्वांसोबत शिकण्याच्या दृष्टीने अर्थात सर्वसमावेशित शिक्षण देण्याचा कायदा आहे. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वांमध्ये सामावून घेऊन शिक्षण देऊन आणि पुढील आयुष्यात त्यांचे अपंगत्व विसरून त्यांना स्वावलंबी आणि विशेषत: आत्मनिर्भर करण्यासाठी मदत करीत आहेत, त्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र.-१३0 च्या शिक्षिका आशा तेलंगे.
अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्ती कमी नाहीत, पण त्यासाठी गरज असते ती त्यांच्या कुटुंब, समाज आणि शाळा या घटकांनी त्यांना सर्वांगीणदृष्ट्या सक्षम करण्याची. आपल्या शाळेत प्रवेश घेतल्यावर अशाच दिव्यांग मुलांना समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आशा तेलंगे या कार्यरत आहेत. मुळात या मुलांना इतर मुलांना स्वीकारायला लावणे, त्यांच्याबद्दल मनातील किळस दूर करायला लावणे, त्या मुलांना चिडवायचे नाही, हसायचे नाही, ही भावना त्या तयार करतात.
शारीरिक व्यंग असलेल्या मुलांना शक्य तितके स्वत:चे काम स्वत: करायला लावून स्वावलंबी बनवतात. गेल्या वर्षी आशा यांच्या वर्गात पाच दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत होते. आतापर्यंत त्यांच्याकडून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह करत आहेत. कोणी दोन्ही पायांनी अपंग असून मैत्रिणींना सोबत घेऊन बचत गट चालवते, कोणी घरच्या घरी इतर मुलांच्या शिकवण्या घेते, तर कोणी कर्णबधिर असूनही हातशिलाई करते. सध्याच्या काळात मास्क, पिशव्या शिवून संसार सांभाळते. अशा दिव्यांग पण स्वावलंबी असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास संपल्यावरही आशा मार्गदर्शन आणि सहकार्य करतात.
शिक्षकी पेशात आल्यापासून मला अशा मुलांसाठी काम करण्याची संधी प्राधान्याने मिळाली. आरपीडब्ल्यूडी अॅक्ट २0१६ नुसार या मुलांना सर्वसमावेशित शिक्षण देणे सक्तीचे आहे. मात्र, त्याआधीही माझ्या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना मी शिकवायचे. या माझ्या कार्यात मला विद्यार्थ्यांचे पालक, सहकारी, मुख्याध्यापक, ठाणे मनपाचे सर्व अधिकारी यांचे सहकार्य मिळते. त्यामुळेच हे काम शक्य होते. - आशा तेलंगे, शिक्षिका