‘ती’ची हत्या अंधश्रद्धेतून
By admin | Published: September 2, 2015 01:52 AM2015-09-02T01:52:51+5:302015-09-02T01:52:51+5:30
संगीता अत्रे या महिलेच्या हत्येचे गुढ उकलण्यात एमएफसी पोलिसांना यश आले आहे. ही हत्या अंधश्रद्धेतून झाली असून करणी केल्याच्या संशयातून मेव्हणा
कल्याण : संगीता अत्रे या महिलेच्या हत्येचे गुढ उकलण्यात एमएफसी पोलिसांना यश आले आहे. ही हत्या अंधश्रद्धेतून झाली असून करणी केल्याच्या संशयातून मेव्हणा कृष्णा सफालिका यानेच अन्य एकाच्या मदतीने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पश्चिमेतील ठाणगेवाडी परिसरात राहणाऱ्या संगिता यांचा मृतदेह हत्या केलेल्या अवस्थेत जुना कसारा घाटात आढळला होता. १२ आॅगस्टच्या रात्री त्या रहात्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी त्यांचे पती उमेश यांनी
एमएफसी पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. कसारा पोलिसांकडून गुन्हा वर्ग झाल्यावर एमएफसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान तपासात संगिताच्या बहिणीचा नवरा कृष्णा यानेच तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले.
संगिता आणि तिची बहिण लिना या दोघींमध्ये पटत नव्हते. लिना ही आजारी होती. आजार बरा होत नसल्याने संगिता हिने आपल्यावर करणी केली असून त्यामुळेच माझा आजार बरा होत नाही, असे तीने पती कृष्णाला सांगितले होते. दरम्यान लिनाचा जानेवारी २०१५ मध्ये मृत्यू झाला.
संगिताने करणी केल्यामुळेच मृत्यू झाला असा राग कृष्णाच्या मनात होता. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कृष्णाने यात त्याच्या मित्र संदीप माळी याची मदत घेतली.
फोन कॉल डिटेलवरून गुन्हा उघड
संगिता यांचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्यांना आलेल्या कॉलची तपासणी केली असता अखेरचा कॉल हा कृष्णा यांचा आल्याचे दिसून आले. त्यावरून
तपास करून या गुन्हयातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.