घोडबंदर भागात जलवाहीन्यांमध्ये साडी, आधारकार्ड, पिलो कव्हर, डोंगरीपाड्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:34 PM2018-11-03T17:34:19+5:302018-11-03T17:35:54+5:30
घोडबंदर भागात जलवाहीनी साफ करीत असतांना त्यातून साड्या, उशीचे कव्हर आढळून आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ठाणे - दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच ठाण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे महापालिकेच्या डोंगरीपाडा येथील जलवाहिन्यांमध्ये चक्क साड्या, उशीचे कव्हर, कपडे आदींबरोबरच आधारकार्ड आढळले आहे. दरम्यान, महापालिकेच्या जलकूंभांवर सुरक्षाव्यवस्था नसल्याने असा प्रकार होत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेने पाणीवितरणासाठी विविध भागात जलकूंभ उभारले आहेत. मात्र, बहूसंख्य ठिकाणी सुरक्षाव्यवस्था नाही. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर गर्दुल्ले, मद्यपी, टवाळखोरांचा वावर असल्याच्या तक्र ारी आहेत. याबाबत नगरसेवक डुंबरे यांच्याकडून सातत्याने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डोंगरीपाडा येथील वामननगर परिसराला काही दिवसांपासून अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नगरसेवक डुंबरे यांनी तक्र ारी केल्या. मात्र, पाण्याचा दाब पुरेसा असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जात होता. मनोहर डुंबरे यांच्या मागणीनुसार जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वामननगर परिसरात जलवाहिनीतून साड्या, टाकाऊ कपडे, उशीचे कव्हर आदींबरोबरच आधारकार्ड आढळले. महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रु पये खर्च केले जातात. मात्र, महापालिकेने जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमले नसल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा संशय डुंबरे यांनी व्यक्त केला.