शेलार हल्लाप्रकरण : मनपा अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:15 AM2020-11-26T01:15:48+5:302020-11-26T01:16:18+5:30

शेलार हल्लाप्रकरण : दोन आरोपी फरार

Shelar attack case: Municipal officials arrested | शेलार हल्लाप्रकरण : मनपा अधिकारी अटकेत

शेलार हल्लाप्रकरण : मनपा अधिकारी अटकेत

Next

सदानंद नाईक

उल्हासनगर : मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावरील हल्लाप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने महापालिका महिला व बालकल्याण अधिकारी सचिन वानखेडेसह दोघांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वी गुन्हे विभागाने चौघांना अटक केली असून दोघे फरार असल्याची माहिती गुन्हे विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली आहे.

शेलार यांच्यावर अंबरनाथ गोविंद पुलाजवळ चार अनोळखी इसमांनी ८ ऑक्टोबरला तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर, शहर गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करून कल्याणमध्ये राहणाऱ्या चारजणांना अटक केली.  मात्र, हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला. शेलार यांनी मनपा शिक्षण मंडळासह अवैध बांधकाम, अन्य समस्यांविरुद्ध आवाज उठविला असून यातूनच आपणावर हल्ला झाला असावा, अशी शंका व्यक्त केली होती. पोलिसांनी चौघांना बोलते केले असता, फरार असलेल्या धर्मेश व नागेश यांनी आम्हाला मारण्यास सांगितल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात अटक झालेल्या चौघांचे मोबाइल संभाषण तपासले असता,  धर्मेश, नागेशसह संतोष पगारे व  वानखेडे यांचे संभाषण झाल्याचे उघड झाले. यातून पगारे याच्यासह वानखेडे यांना गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केल्याची माहिती तरडे  यांनी दिली. 

‘त्यांच्याशी संबंध नाही’ 
सचिन वानखेडे व माझा कधीही संबंध आला नाही. तसेच त्यांच्याकडे त्यांची वैयक्तिक व विभागासंदर्भात कोणतीही माहिती मागितली नाही. मग, माझ्या हल्ल्यामागील सूत्रधार महापालिका अधिकारी कसा काय होऊ शकतो, याबाबत शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: Shelar attack case: Municipal officials arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.