भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 02:42 PM2021-05-10T14:42:17+5:302021-05-10T15:18:33+5:30
भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणानावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी: तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे . त्यातच खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलांमुळे कोरोना रुग्णानासह नातेवाईकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे . भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी नागरिकांची समस्यां लक्षात घेता ग्राम पंचायती मार्फत ५० खतांचे कोविड सेंटर उभारले आहे. शेलार ग्राम पंचायतीच्या सरपंचांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेलार गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या ग्राम पंचायतीने थेट कोविड सेंटर उभारले असलेली जिल्ह्यातील किमान एकमेव ग्राम पंचायत म्हणून शेलार ग्राम पंचायत सध्या चर्चेत आली आहे.
भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणानावर मोठा ताण निर्माण झाला आहे . त्यातच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी भिनार व सवाद या दोन ठिकाणीच शासकीय कोविड सेंटर बनविण्यात आले आहे. मात्र या दोन्ही सेंटर मध्ये अजूनही हवी तशी सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेतांना पाहायला मिळतात . मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत . या आर्थिक लुटीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच ग्राम पंचायतींमार्फत कोविड सेंटर उभारण्यासाठी शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी मोठी मेहनत घेतली आहे . गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ५० खतांचे हे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या देखील ग्राम पंचायतीने घेतल्या असून शुक्राची या कोविद सेंटरची पाहणी भिवंडी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान ग्राम पंचायतीच्या मार्फत लवकरच हे कोविड सेंटर सुरु होणार आहे मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामामुळे आम्हाला अनेक अडचणी आल्या आजही काही विघ्नसंतुष्ट शासकीय अधिकारी आम्हाला कोविड सेंटर उभारण्यासाठी शासकीय नियमांचे पाढे वाचून अडवणूक करत आहे हे दुर्दैवी असून जिल्हाधिकाऱ्यांसह , जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे असून लवकरात लवकर हे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी ग्राम पंचायतीस सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी दिली आहे.