भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत कोविड सेंटर; समन्वयाचा अभाव असल्याचा सरपंचांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:04 PM2021-05-20T16:04:40+5:302021-05-20T16:07:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : शेलार ग्राम पंचायतीने उभारलेले कोविड सेंटर ग्राम पंचायतीतील नागरिकांबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Shelar Gram Panchayat Covid Center in Bhiwandi Sarpanch alleges lack of coordination | भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत कोविड सेंटर; समन्वयाचा अभाव असल्याचा सरपंचांचा आरोप

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत कोविड सेंटर; समन्वयाचा अभाव असल्याचा सरपंचांचा आरोप

googlenewsNext

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची मान्यता अजूनही मिळाली नसल्याने हे कोविड सेंटर रुग्णांना सेवा देण्यापासून आजही वंचित आहे. शेलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शेलार जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर अवघ्या १५ दिवसांत ग्राम निधी व लोकसहभागातून उभारले आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींसह माध्यमांनी या विषयाची गंभीर दखल घेऊनही या कोविड सेंटरला अजून मान्यता का मिळत नाही की यात राजकारण फोफावत आहे अशी शंका शेलार ग्रामचे सरपंच किरण चन्ने यांनी व्यक्त केली असून कोविड सेंटर तयार होऊनही दहा ते बारा दिवस उलटूनही हे कोविड सेंटर सरकारी बाबूंच्या मान्यतेमुळे आजही रखडले आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या रुग्णसंख्या वाढत असून अनेक ठिकाणी नागरिकांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाही तर खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तर सर्वसामान्य नागरीकांनी महागड्या खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेलार ग्राम पंचायतीने उभारलेले कोविड सेंटर ग्राम पंचायतीतील नागरिकांबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता मिळाली नसल्याने हे कोविड सेंटर सुरु होण्यापासून रखडले आहे. 

विशेष म्हणजे या कोविड केअर सेंटरला ठाणे जिल्हा वैद्यकीय अधिकारी मनीष रेंगे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती कुंदन पाटील यांनी स्वतः भेट देऊन या कोविड सेंटरची पाहणी व प्रशंसा केली होती. त्यानंतर राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिफारस, विनंती व मागणीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरता कानाडोळा केला आहे. त्यामुळे कोविड सेंटर सुरु होण्यापासून रखडले आहे. 

दरम्यान अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता सदर प्रकर जिल्हाधिकारी यांच्याकडेच प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे, आरोग्य विभाग देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच बोटं दाखवितात त्यामुळे त्यामुळे हे कोविड सेंटर सुरू करण्यात जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे एकमेकांशी समन्वय नसल्यानेच आजपर्यंत हे कोविड सेंटर सुरू झाले नाही. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी आणखी किती खेळ खेळणार अशी प्रतिक्रिया शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांनी दिली आहे. 
 

Web Title: Shelar Gram Panchayat Covid Center in Bhiwandi Sarpanch alleges lack of coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.