कौतुकास्पद! भिंवडीतील शेलार ग्रामपंचायत ठरली रात्र गस्त पथक नेमणारी राज्यातील पहिली ग्राम पंचायत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 05:14 PM2022-03-16T17:14:18+5:302022-03-16T17:14:49+5:30
भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीने गावच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने रात्र गस्त पथकाची स्थापना केली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी :
भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीने गावच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने रात्र गस्त पथकाची स्थापना केली आहे. बुधवारी शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांच्या संकल्पनेने साकारलेल्या या रात्र गस्त पथकाला हॉकी टॉकी व सुरक्षेची साधने पुरवत या सुरक्षा मोहिमेचा उदघाटन ग्राम पंचायत सभागृहात करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य महिला सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेलार ग्राम पंचायत शहरालगत असल्याने या ठिकाणी लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गावात चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली असल्याने नुकताच खोणी गावातील वकील विजय पाटील यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील सोने लुटून त्यांच्या आईला जखमी केले होते. या व अशा घटनांची पुनरावृत्ती नको म्हणून सरपंच चन्ने यांनी गावात रात्र गस्त पथकाची नेमणूक किलो असून या पथकातील सर्व सुरक्षा रक्षकांना हॉकी टॉकी व इतर सुरक्षेची साधने पुरविण्यात आली असून हे पथक तालुका पोलिसांच्या संपर्कात राहणार असून रात्री गावात घडणाऱ्या घडामोडी किंवा इतर संशयीत घटनांवर नजर ठेवून पोलिसांना तत्काळ माहिती देणार असल्याने या पथकामुळे निश्चितच गावातील सुरक्षेत भर पडणार असल्याचा विश्वास सरपंच चन्ने यांनी उदघाटन प्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.