शीळ-कल्याण मार्गाचा मेकओव्हर!
By admin | Published: October 4, 2016 02:27 AM2016-10-04T02:27:03+5:302016-10-04T02:27:03+5:30
ठाणे ते शीळ मुंब्रा मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून आता वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुंब्रा दरम्यान
ठाणे : ठाणे ते शीळ मुंब्रा मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून आता वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुंब्रा दरम्यान पारसिकडोंगरातून भूयारी मार्ग आणि पुढे एलिव्हेटेड मार्गही एमएमआरडीने प्रस्तावित केला आहे. यासाठी सुमारे ३७४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर शीळ फाटा जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यात येणार असून यासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण कामांच्या निविदा काढल्या असून २०१९ पर्यंत ती पूर्ण होतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. शिवाय याकामात अडथळा ठरणाऱ्या मुंब्रा बायपास रोडवरील वीजवाहिन्या बदलण्यासाठी आणि ट्रान्सफर्मा उभारण्यासाठी ८ कोटी ६७ लाखाची निविदा काढली आहे. एकूणच आता या भागासाठी तब्बल ४६० कोटींचे हे जम्बो काम येत्या काळात मार्गी लागणार आहे.
ठाणे ते शीळ तसेच मुंब्रा मार्गावर होणारी वाहतूककोंडी तसेच नवी मुंबईकडून शीळ मार्गावरही वाहन चालकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावर भुयारी मार्ग असावा, अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी केली होती. दरम्यान, मुंब्रा-ऐरोली भुयारी मार्गातून पुढे बेलापूरपर्यंत जाता येणार आहे. या कामांचे एमएमआरडीएने नुकतेच टेंडरही प्रसिद्ध केले असून पुढील ४० महिन्यात २०१९ मध्ये काटई-मुंब्रा-ऐरोली असा हा रस्ता ठाणे-शीळ मुंब्रा या महाभयंकर वाहतूक कोंडीवर उतारा ठरणार आहे. तो चारपदरी असणार आहे. या रस्त्यांच्या मार्गात भारत गिअर कंपनी, वनखाते आणि थोडेफार नागरीकरण असे तिहेरी अडथळे होते. त्यापैकी वनखात्याच्या बाधीत जमिनी एवढी जमीन वनीकरणासाठी देण्याची मंजुरी मिळाल्यामुळे वनखात्याचा मोठा अडसर संपला आहे. तर भारत गिअर कंपनीची जमीन वर्ग करण्याची प्रक्रि या ठामपाने सुरू केली असून संयुक्तपणे एमआयडीसीच्या बाधीत जमीन आराखड्यावरदेखील शासनाच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आता ही प्रक्रि या केवळ निविदा उघडण्याच्या प्रतिक्षेत असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)