देह व्यापार करणाऱ्या महिलांच्या चिमुकल्यांसाठी निवारा केंद्र सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:50 PM2021-10-21T18:50:18+5:302021-10-21T18:51:45+5:30
देहव्यापार करणाऱ्या महिला व त्यांची बालके यांचे शिक्षण, संगोपन व पुनर्वसन प्रकल्पास निवारा गृह या योजने अंतर्गत केंद्र शासना मार्फत अनुदानीत तत्वावर नवजीवन निवारा केंद्र या संस्थेस मान्यता दिली.
नितिन पंडीत
भिवंडी - शहरातील हनुमान टेकडी वरील देह व्यापार करणाऱ्या महिलांच्या वस्तीतील वय वर्षे तीन ते दहा वयोगटातील चिमुरड्यांसाठी महिला व बाल विकास विभाग तसेच श्री साई सेवा संस्था यांच्या प्रयत्नातून नवजीवन निवारा केंद्र सुरू करण्यात आले असून चिमुरड्यांना निवारा गृहात घेऊन जाणाऱ्या मुक्ती एक्स्प्रेस या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
समाजाकडून सदैव तिरस्कार व हेटाळणी होणाऱ्या समाजाला सेवाभावी वृत्तीतून काम करीत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असून त्यासाठी त्यांच्या पुढील पिढीवर संस्कारक्षम विचार बिंबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भिवंडी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे ,पालिकेचे शहर अभियंता एल पी गायकवाड, ठाणे जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ सुधीर सावंत, साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती खान सिंग,नवजीवन निवारा केंद्राचे संचालक फादर मनू ,फादर जॉर्ज आदी मान्यवर उपस्थित होते.
देहव्यापार करणाऱ्या महिला व त्यांची बालके यांचे शिक्षण, संगोपन व पुनर्वसन प्रकल्पास निवारा गृह या योजने अंतर्गत केंद्र शासना मार्फत अनुदानीत तत्वावर नवजीवन निवारा केंद्र या संस्थेस मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी यावेळी दिली असून या केंद्रामध्ये या बालकांच्या राहण्याची शिक्षणाची तसेच आहाराची संपूर्ण सुविधा विनामुल्य तत्वावर उपलब्ध करून देण्यात येत असून संस्थेमध्ये या बालकांना ठेवण्यासाठी त्यांच्या मातांना समुपदेशन करणे, शिक्षणाचे महत्व पटवून देणे व सदर महिलांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे या बाबी गेल्या अनेक वर्षापासून साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सिंग (खान) या करत आहेत त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या बालकांची शिक्षण, संगोपन, पुनर्वसनाची सोय झाल्याचे महेंद्र गायकवाड यांनी शेवटी स्पष्ट केले .
या निवारा केंद्रात बालकांच्या जिवनामध्ये भविष्यात येणारा अंधार नष्ट होऊन त्यांच्यावर चांगल्या संस्काराचे बाळकडू रुजविण्याचा प्रयत्न नक्की यशस्वी होणार असल्याचा विश्वास डॉ स्वाती सिंग खान यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या कार्यक्रम प्रसंगी मनपा आयुक्तांनी येथील महिलांशी संवाद साधत सर्वांना मतदार नोंदणी ओळखपत्र करून घेण्याचे आवाहन केले. त्यांनतर गणेश सोसायटी येथील नवजीवन निवारा गृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते नवजीवन निवारा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.