ठाणे पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्याने दिला निराश्रिताला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:30 PM2018-05-10T23:30:45+5:302018-05-10T23:30:45+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील सेवा रस्त्यावर आश्रय घेतलेल्या एका फिरस्त्याला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्याने कर्जतच्या पुनर्वसन केंद्रामध्ये निवारा मिळवून दिला.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र रघुनाथ गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोलीस आणि या सामाजिक कार्यकर्त्यामुळे एका सामाजिक संस्थेत आश्रय मिळाल्यामुळे गवारे यांच्या चेह-यावर हास्य फुलले.
पूर्व द्रुतगती मार्गावरील नौपाड्यातील ‘शनया’ हॉलच्या समोर गवारे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच निवारा शोधला होता. त्यांच्याकडे दयाकर यांनी विचारपूस केली, तेव्हा त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. मुले किंवा पत्नीही नसल्याचे त्यांनी सांगितले. दयाकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव यांना ही माहिती दिली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलेशन फाउंडेशन सेंटर या पुनर्वसन केंद्राला या निराश्रित फिरस्त्याची माहिती देऊन त्याला या केंद्रात आश्रय देण्याची केंद्राच्या व्यवस्थापकांना ८ मे रोजी पत्राद्वारे विनंती केली. गवारे हे बेघर आणि बेवारस असल्यामुळे त्यांना संरक्षण आणि काळजीची गरज असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले. या पत्राची दखल घेऊन या केंद्राने गवारे यांना आपल्या पुनर्वसन केंद्रात आश्रय देण्याचे तत्काळ मान्य केले. त्यानुसार, ओऊळकर यांच्या पथकाने त्याची एका खासगी वाहनाने बुधवारी वाणगाव व्हिलेजमधील श्रद्धा रिहॅबिलेशन फाउंडेशन केंद्रामध्ये रवानगी केली. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आपल्याला हक्काचा निवारा मिळाल्यामुळे गवारे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
‘‘गेल्या अनेक दिवसांपासून सेवारस्त्यावर हरिश्चंद्र गवारे या फिरस्त्याने उघड्यावरच आश्रय घेतला होता. आपल्याला कोणाचाच आश्रय नसल्यामुळे इच्छामरण मिळावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. दयाकर यांनी त्याची काळजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पदरमोड करून त्याला कर्जत येथील पुनर्वसन केंद्रात सोडवण्याची व्यवस्था केली.’’
चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे